व्यक्तिवेध : झुंझार लोकमान्य नेता अनिल भैय्या राठोड

शिवसेनेचे झुंजार उपनेते तथा माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे आज (५ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनिल राठोड यांनी प्रकृती बरी नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना आज पहाटे ५.३० वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. मुख्यमंत्री यांनी देखील श्रद्धांजली वाहताना सांगितले की, शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला. हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे..! या झुंजार लोकमान्य नेत्याला दैनिक लोकशक्ती कडून शब्द सुमनांनी भावपूर्ण श्रद्धांजली..!

पावभाजी विक्रेता ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री असा प्रवास करणारे आणि संपूर्ण जिल्ह्याचे भैय्या असलेले अनिलभैय्या रामकिसन राठोड यांचे निधन जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला विशेषत: शिवसेनेला वेदनादायी आहे. भैय्या नावाचे जवळपास चाळीस वर्षांच्या वलयाचा अस्त आज झाला. निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पार्श्‍वभूमी, स्वत:च्या शिक्षण संस्था, साखर कारखाने किंवा मोठमोठे व्यवसाय असावेच लागतात, हा समज खोडून काढणारे महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजता येणारे आहेत. अशा नेत्यांमध्ये अनिलभैय्यांचा समावेश होतो. लोकांसाठी रस्त्यावर येणारा, लोकांसाठी जगणारा आणि लोकांच्या मनात कायम आपली छाप सोडणार्‍या या नेत्याचा अंत अनेक बंधने असणार्‍या काळात व्हावा, हे आणखी एक दुर्दैव.

उदरनिर्वाहासाठी राजस्थान ते मंचर आणि मंचर ते नगर असा प्रवास करणारे राठोड कुटुंब आपल्या स्वभावामुळे नगरकरांच्या मनात रुजले, ते राठोड यांच्या अंतापर्यंत कायम राहिले. मार्चपासून देशाला कोरोनाने घेरले. याच काळात सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचा आणि त्यामुळे जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. राठोड यांनी शिवसेनेच्या शिलेदारांना सोबत घेत अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला. अगोदरच सर्वसामान्यांशी घट्ट नाते तयार केलेले राठोड या उपक्रमाने सर्वसामान्यांच्या हृदयाच्या सिंहासनावर आरूढ झाले.

सुरुवातीला नेताजी सुभाष चौक आणि राठोड हे समीकरण होते. त्यानंतर सलग २५ वर्षे नगर विधानसभा आणि अनिलभैय्या असे समीकरण तयार झाले. शिवसेनेचा जिल्ह्यातील चेहरा म्हणूनच राठोड यांच्याकडे पाहिले जायचे. उदरनिर्वाहासाठी नेताजी सुभाष चौकात पावभाजी विक्री व्यवसाय त्यांनी सुरू केला. हुरहुन्नरी तरूण म्हणून त्याचवेळी त्यांची ओळख निर्माण झाली. सुरूवातीपासून रक्तात भिनलेले हिंदुत्त्व त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.

हिंदू एकता आंदोलनाच्या रुपाने त्याला सामाजिक स्वरूप आले. त्यांची ही कडवट हिंदुत्त्ववादी भूमिका शिवसेनेला भावली. त्यांच्यावर नगर शहराची जबाबदारी टाकण्यात आली. तेंव्हापासून राठोड यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. शिवसैनिक ते शिवसेनेचे उपनेते आणि सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्यमंत्री हा त्यांचा प्रवास जिल्ह्यातील भल्याभल्यांना तोंडात बोट घालायला लावणारा ठरला. राज्यातील व जिल्ह्यातील अनेक कडवट हिंदुत्त्वाद्यांनी सत्तेच्या गादीवर बसण्यासाठी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, पण राठोड शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. अनिल राठोड यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे.

– राजेश औटी, नगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *