व्यक्तीवेध – ‘नारी तू नारायणी’चा वसा : समाजसेविका सौ. स्वाती कदम

‘नारी तू नारायणी’चा वसा : समाजसेविका सौ.स्वाती कदम यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा संघर्षमय राजकीय प्रवास…

महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. अर्थात राजकारणाचे क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. आजमितीला राज्याच्या विधानमंडळात अनेक महिला सदस्य आपले कर्तृत्व गाजवत आहेत. पक्षभेद विसरुन राज्याच्या प्रगतीत आपले योगदान देत आहेत.

तुम्ही लोकांमध्ये जाऊन जोपर्यंत मिसळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना समजू शकणार नाहीत, या विचारांवर कायम चालणाऱ्या सौ.स्वाती कदम यांनी आजवर अनेक निराधारांचे प्रश्न लावून धरत त्यांना न्याय मिळवून देण्याचा वसा गेली कित्येक वर्षे सुरू ठेवला आहे. याच कामाचे फलित म्हणून त्यांचा राजकारणातील वावरही त्यांना यशाच्या शिखरापर्यंत नेऊ शकला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी अव्याहतपणे हे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त सौ.स्वाती कदम यांच्या इथवरच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा…

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सौ.स्वाती कदम यांनी एखाद्या कामाची ध्येयनिश्चिती केली की, ती पूर्णत्वास नेईपर्यंत स्वस्थ न बसणे ही त्यांच्या कामाची पद्धती व स्वभाव सर्वश्रुत आहे. आजही लोकांमध्ये मिसळून त्यांचे कामे जातीने लक्ष घालून पुढे नेण्याच्या स्वभावाने त्या राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकल्या.

स्वाती कदम यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, महिलांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. मात्र, समाजकार्यात जनतेची कामे करताना येणाऱ्या मर्यादा आणि अडथळे लक्षात घेत त्यांनी सक्रीय राजकारणात येण्याचा निर्धार केला. २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.कल्याण पश्चिम क्षेत्रात पूर्वीपासून गाठीशी असलेल्या समाजकार्याच्या अनुभवामुळे राजकीय वर्तुळातही त्या लोकप्रिय ठरल्या. पक्षाचे काम करत असताना आपल्या विभागातील महिलांचे प्रश्न हाताळण्याचे काम त्यांनी सचोटीने केले.

पक्षातर्फे त्यांच्या कामाची दखल घेण्यात येऊन मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षा या पदाची धुरा सोपविली.ही जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली.समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची पाळेमुळे आणखी मजबूत केली होती. अर्थात राजसाहेबांनी सोपविलेली जबाबदारी त्यांच्यासाठी आव्हानात्मक होती. मात्र, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप इथेही पाडली. राजकीय कौशल्य आणि काम करण्याच्या त्यांच्या पद्धतींमुळे आपल्या विभागात त्या एक लोकप्रिय समाजसेविका म्हणून त्यांनी छाप उमटवली आहे.राजकारणात आल्यानंतर या सेवेसाठी जोडणारे अनेक हात त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. एक समाजसेविका म्हणून पाणी, वीज, अतिक्रमणे, रस्ते, शौचालये आदी मूलभूत समस्यांवर त्यांनी काम केलेच, मात्र, त्याचसोबत कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर बसणाऱ्या अनधिकृत फेरील्यांनाविरोधात कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा केला,त्याचप्रमाणे काळ्या-पिवळ्या टॅक्सीमधून ८ प्रवाशांच्या वाहतुकीला परवानगी असताना १४-१४ प्रवासी मेंढरांप्रमाणे कोंबले जातात यासाठीं वाहतूक यंत्रणेला धारेवर धरले,रस्त्यांच्या कामात झालेला करोडो रुपयांचा घोटाळा पुराव्यानिशी सादर केला.

विभागातील महिला एखादी समस्या घेऊन त्यांच्याकडे पोहोचतात, तेव्हा लगेचच यातून मार्ग काढतात.अनेक कामे आणि उपक्रम त्यांनी आपल्या विभागात राबवले आहेत. एक सर्वसामान्य महिला कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या इथवरच्या प्रवासात मला मिळालेला मान आणि काम करण्याची संधी हे माझे भाग्य आहे, असे त्या सांगतात.

महिला सक्षमीकरणाचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. कुठलाही प्रसंग असो, कुठलेही संकट असो आपल्या भगिनींसाठी धावून येणारी हक्काची राजकारणापलीकडचे व्यक्तिमत्त्व, अशी ओळख त्यांनी आपल्या विभागात तयार केली आहे. हजारो महिलांचा आधारस्तंभ म्हणून सदैव पाठीशी राहणाऱ्या सौ.स्वाती कदम यांचा आज २७ जुलै हा जन्मदिवस… त्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा…!!!

– प्रकाश संकपाळ ( अध्यक्ष – श्रमिक पत्रकार संघ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *