शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा: पुष्प चौथे – कित्येक बालकांच्या जगण्यातील संघर्ष कमी करत त्यांच्या जीवनात शिक्षणाचा अविरत आनंद निर्माण करणारा व आपल्या जिद्दीने विद्यार्थी विकासात नेहमी प्राणिकतेचा ठसा उमटवणारा अवलिया शिक्षक प्रविण भीमराव शिंदे.

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक शाळा पाहता, यात तिथे काम करणाऱ्या शिक्षकांचा वाटा सर्वाधिक मोठा किंबहुना त्यांच्यामुळेच ते शक्य झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ५ स्पटेंबर शिक्षक दिन या दिवशी शिक्षकांबद्दल उपकृत होण्याचा प्रयत्न समाज करत असतो. परंतु त्याहून अफाट काम करणाऱ्या या शिक्षक रत्नांची त्यांच्या आभाळाएवढ्या कामाची अल्प माहिती सर्वांसमोर यावी त्या दृष्टीने दैनिक लोकशक्ती ४ सप्टेंबर पासून १५ सप्टेंबर पर्यंत ‘ शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा ही लेखमाला सुरू करत आहोत.

यातून असामान्य काम करणाऱ्या प्रेरणादायी अवलियांची गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत.

नक्की वाचत रहा..!

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा

पुष्प चौथे : कित्येक बालकांच्या जगण्यातील संघर्ष कमी करत त्यांच्या जीवनात शिक्षणाचा अविरत आनंद निर्माण करणारा व आपल्या जिद्दीने विद्यार्थी विकासात नेहमी प्राणिकतेचा ठसा उमटवणारा अवलिया शिक्षक श्री.प्रविण भीमराव शिंदे .
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

हातातील संघर्षाचे झोळी फेकून
आता आम्ही हाती घेतली आहेत शिक्षणाची दप्तरे….
जे धारदार होऊन लढायला शिकवतील ….!

प्रत्येक मुलाला शिकावं वाटतं. इतरांप्रमाणे बागडाव वाटतं. शाळेच्या चार भिंतीत जाऊन गगन भरारीचे स्वप्न प्रत्येक चिमुकल्या पंखांना असतंच.जस प्रत्येक फुलाला वाटतं तसं प्रत्येक मुलाला भरभरून जगावसं वाटतं. मग ते झोपडीतल्या मुल असो वा रानातलं.. रस्त्यावरचं वा महालातले. आम्ही त्या प्रत्येक पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, जय हिरमसून बसला आहे नशिबाचा अंधारात.त्या फुलाला भविष्याचा तेजस्वी सूर्य दाखवून त्याच्या जगण्यात तेज निर्माण करण्याचा त्यांचा हट्ट आहे..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळई वस्ती ही अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील एक छोटीशी शाळा. मात्र सध्या ही शाळा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे. या शाळेतील प्रविणकुमार शिंदे यांनी मुलांच्या आनंददायी शिक्षणासाठी राबवलेले काही उपक्रम आता आपण पाहू या …

●  चित्रकला क्राफ्ट यांच्या एकात्मते तून शिक्षण

स्वतः शिक्षक अतिशय उत्तम चित्रकार असल्याने ते शिक्षणातील विविध संबोध चित्रांच्या , क्राफ्ट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहजतेने व आनंददायी पद्धतीने शिकवत आहेत. यातून विविध संकल्पना व संबोध हे स्पष्ट होत असून त्याचे दृढीकरण ही होत आहे.

●  डॉ. अब्दुल कलाम बालवाचनालय

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शाळेने डॉ. अब्दुल कलाम बाल वाचनालय सुरु केले. या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके वाचावयास मिळत असून त्यांच्यामध्ये वाचन सराव व एकूणच भाषा व विचार कल्पना समृद्धी झाल्याचे दिसून येत आहे. या वाचनालयातील पुस्तके ही विविध स्तरातील लोकांकडून जमवलेली आहेत. या वाचनालयासाठी औरंगाबाद स्थित उपायुक्त भारतीय राजस्व सेवा श्री विजय नेटके सर यांनी ही पुस्तके पाठवली आहे. या माध्यमातून वाचनालय समृद्ध होत आहे.

●  पर्यावरण शिक्षण पर्यावरण रक्षण

जागतिक चिमणी दिन हा शाळेमध्ये दरवर्षी साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने मूठभर धान्य व पाणी असा उपक्रम राबवण्यात येतो. जगभरातील एकूणच प्राणी व पक्षी यांची माहिती कायम विद्यार्थ्यांना देण्यात येत असते. आणि जागतिक वन दिनाच्या निमित्ताने शाळेत व शाळांच्या इतर परिसरात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येते. यामधून पर्यावरण रक्षण व पर्यावरण संवर्धन करण्याचे जबाबदारी विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते.

●  आनंदी बाजार

विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण मिळावे म्हणून, शाळेमध्ये दरवर्षी एकेदिवशी आठवडी बाजाराचे आयोजन हे आनंदी बाजार या उपक्रमाद्वारे करण्यात येते. यामधून विद्यार्थी गणित विज्ञान, पैशांच्या स्वरूपातील व्यवहार इत्यादी व्यवहार विषय ज्ञान, तसेच भाषा शिक्षण, संवाद कौशल्य विकसन यांची जडण-घडण या माध्यमातून होते.

बाल संस्कार शिबिर

वारकरी संप्रदाय हा एक मानवतावादी विचारांचा संप्रदाय असल्याचे दिसून येते. या माध्यमातून शाळेत बाल वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना एकात्मता, बंधुभाव, परस्पर सहकार्य, सामंजस्य, जात-पात-धर्म भेद न करण्याची शिकवण या माध्यमातून देण्यात येते.

●  स्पर्धा परीक्षांची तयारी

शाळेमध्ये चौथीपर्यंतच वर्ग आहे परंतु इयत्ता दुसरी पासूनच या विद्यार्थ्यांची स्पर्धापरीक्षांची आवश्यक तयारी व अभ्यास नियमितपणे करून घेण्यात येतो. इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रज्ञाशोध परीक्षांना बसवण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात येते. यातूनच शिष्यवृत्ती नवोदय सारख्या स्पर्धा परीक्षांचा बेस तयार होतो.

प्रात्यक्षिक – प्रकल्प पद्धतीतून शिक्षण

विद्यार्थ्यांना आनंददायी तसेच सहज शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पना संबोध पाठ हे प्रात्यक्षिक उपक्रमातून आणि प्रकल्प पद्धतीतून शिकविण्यात येतात. गणित विषय हा बहुतांश वेळा प्रात्यक्षिकाद्वारे शिकविण्यात येतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणित संबोध स्पष्ट होण्यास मदत होते व विद्यार्थी ते ज्ञान सहजरीत्या आकलन करत आहेत.

परिसर भेट-शेती शिक्षण

शाळेत येणारे बहुतांश मुले ही शेतकऱ्यांची मुले असल्याने त्यांना त्यांच्या बोलीभाषेत तसेच अभ्यासक्रमातील शिक्षण हे त्यांच्याच परिसरातील असल्याचे परिसरभेट शेती विषयक भेट यातून स्पष्ट करण्यात येते त्यामुळे त्यांचा विविध विषयातील रस वाढतो.

लोकसहभागातून शाळा विकास

शाळा हे गावाच्या विकासाची मंदिर झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून शाळेतील विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी लोकसहभाग केला जातो त्यातून शाळा रूप बदलत आहे. लोकसहभागातून शाळेत डीजीटल बॅनर, शालेय साहित्य, पुस्तके, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेच्या वस्तू शाळेत प्राप्त झाले आहेत. सरपंच व
ग्रामपंचायत कार्यालय यांच्या सहकार्यातून शाळेस बोरवेल, पिण्याच्या पाण्याची टाकी, तारेचे कंपाउंड ही कामे पूर्ण झाली आहे त. शाळेच्या अंगणात छोटेसे झाडांचे गार्डन, ट्री गार्ड, शाळेच्या अंगणात पेविंग ब्लॉक बसविण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे.

डिजिटल शिक्षण

ग्रामपंचायत कार्यालय यांच्या 14 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळत आहे. जगभरातील सामान्य-ज्ञान, युट्युब वरील विविध विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने व आनंददायी पद्धतीने मिळत आहे. विविध ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेत आहेत.

संगणक झेरॉक्स स्कॅनर प्रिंटर

शाळेच्या विविध प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी शिक्षक शाळेतील संगणक, ई-मेल, विविध सॉफ्टवेअर, स्कॅनर, प्रिंटर यांचा वापर करतात यामुळे त्यांचा प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी कमी होतो व ते अधिक वेळ मुलांसाठी देतात. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर ॲप पीडीएफ पावर पॉइंट प्रेझेंटेशन याचा वापर दैनंदिन अध्यापनात करण्यात येतो त्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होऊन अधिक काम होते.

शैक्षणिक ब्लॉग निर्मिती

शिक्षकांनी युनिक टीचर्स या नावाने ब्लॉग व यूट्यूब चैनल तयार केले असून ते विविध शैक्षणिक बाबींचे प्रसारण याद्वारे करत आहे.

मूल्यवर्धन प्रशिक्षण

शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्यामार्फत चालविण्यात आलेल्या मूल्यवर्धन प्रशिक्षण मुलांना देऊन त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, संस्कार तसेच आनंददायी शिक्षण घेण्याची उर्मी उत्साह निर्माण करण्यात आला.

बालचित्रकला स्पर्धा-विविधांगी स्पर्धा सहभाग

शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय बालचित्रकला स्पर्धा व केंद्र सर्व तालुका स्तर विविधांगी स्पर्धा यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्यात येते. यामधून विद्यार्थी शासकीय बालचित्रकला स्पर्धा -विविधांगी स्पर्धा यामध्ये उत्तुंग यश मिळत आहे.

आकाशवाणी अहमदनगर केंद्रावरून मुलांचा कार्यक्रम प्रसारित

आकाशवाणी अहमदनगर केंद्रावरून शाळेतील मुलांच्या प्रतिभेतून गप्पा गोष्टी कविता गाणे नाटिका यांच्या सादरीकरणाचा सुंदर कार्यक्रम बाल मेळा या नावाने प्रसारित करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा अनुभव व आनंदाची पर्वणी होती.

✓  यापूर्वीच्या शाळेतील कार्य

● 2007 साळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चखालेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे रुजू झाल्यानंतर स्वतः रंगरंगोटी करून स्वतः चित्रे काढत शाळा सुशोभीकरण केले. विद्यार्थी विकासाचे विविध उपक्रम राबवत असताना  2009 सली शाळेत पहिला संगणक खरेदी केला. चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले.

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फकराबाद तालुका जामखेड येथे सात वर्ष इंग्रजी माध्यमातून गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन केले. प्रात्यक्षिक व प्रकल्प पद्धतीतून गणित व विज्ञान विषयक अध्यापन केले.
या यातून इसरो संशोधन केंद्र थुंबा येथील शैक्षणिक सहलीसाठी एका विद्यार्थिनीचे निवड झाली.

●टाकाऊ वस्तू, अडगळीच्या खोलीत सापडलेले शैक्षणिक प्रयोग साहित्य यांच्या माध्यमातून शाळेत छोटीशी विज्ञान प्रयोगशाळा विकसित केली. #डिजिटल शाळा: संगणक लॅब, एलसीडी प्रोजेक्टर या वस्तू लोकसहभागातून मिळवून शाळा डिजिटल करण्यामध्ये योगदान दिले.

●इयत्ता सातवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा यांचे सातत्याने मार्गदर्शन करत *शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

●तत्कालीन मुख्याध्यापक, इतर सहकारी शिक्षक पालक ग्रामस्थ यांचे माध्यमातून शाळा आयएसओ मानांकित करण्यामध्ये सहभाग घेतला व यशस्वी रित्या आयएसओ मानांकन मिळविण्यात योगदान दिले.

प्रविणकुमार सरांचे सामाजिक कार्य

● वंचित घटकातील दुर्लक्षित उपेक्षित समाज घटकातील मुलांच्या शैक्षणिक वाढीसाठी, मुलांना शालेय प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने सदर शिक्षक दरवर्षी स्कूल किट डोनेशन हा उपक्रम राबवतात. त्या माध्यमातून दरवर्षी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, विधवा परितक्त्या यांची मुले, दिव्यांग पालकांची मुले, समाजातील दुर्बल दूर उपेक्षित घटकातील मुले अशा जवळपास शंभर मुलांना दरवर्षी आपल्या संस्थेच्या माध्यमातून स्कूल किट पुरवतात. हा उपक्रम गेली तीन वर्षे ते यशस्वीपणे राबवत आहे.

●सरांच्या वेगळ्या उपक्रमाची दखल हेरंब कुलकर्णी लिखित “दुरितांचे तिमिर जावो” या कार्यक्रमात आकाशवाणी अहमदनगर या केंद्रावर 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आली होती.

●गेली सहा वर्षे सातत्याने यशस्वीरित्या दरवर्षी ग्रामीण भागात रक्तदान संकलन शिबिर आयोजित करत असून साधारण 50 बॅग रक्त संकलन दरवर्षी केले जाते. यातून अनेक रुग्णांना फायदा होत आहे. हे रक्त संकलन शिबिर खेड्यात राबवले जात असल्याने याची वेगळी नोंद घ्यावी असे वाटते.

● आपल्या काही डॉक्टर मित्रांच्या मदतीने तसेच आनंदऋषीजी रुग्णालय अहमदनगर यांच्या सहकार्याने दरवर्षी (गेली सहा वर्षे सातत्याने) आरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करतात व यातून मोफत उपचार केला जातो.

✓ या कार्याची दखल म्हणून आनंद ऋषीजी रुग्णालयातर्फे डॉक्टर सुधा व प्रकाश कांकरिया यांच्या हस्ते सरांना समाज गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

✓ जिथे जगण्यासाठी संघर्ष होता. शालेय साहित्य नाही म्हणून शाळेला रामराम ठोकणारे कित्येक मुले मुली सरांनी पाहिली आहेत . शेतकरी कुटुंबातील लेकरं स्वतःच्याच जगण्यावर आसूड चालवत होते . बरबाद झालेल्या संसाराला आधार देण्यासाठी कित्येक लेकरं पाटी-पेन्सिल चा नाद सोडून डोक्यावर मातीने भरलेली पाटी घेत होते. हे चित्र आम्ही बदलण्यात प्रविणकुमार शिंदे सर यशस्वी झाले.

यावेळी सरांनी आमच्याशी संवाद साधताना मत व्यक्त केले – शिक्षणात अडचणी निर्माण झालेल्या प्रत्येक मुलांना प्रोत्साहन आणि मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय . यातून ही मुलं शिकतील.. शिकून ती पुढे विविध सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक क्षेत्रात काम करतील.. याबरोबरच मानवतावादी दृष्टिकोण त्या सर्वांमध्ये निर्माण होईल… आणि राष्ट्र निर्माण होण्याच्या या प्रक्रियेत ते हातात हात घालून नव्या दिशेचा शोध घेण्यात नक्कीच यशस्वी होतील….

✓ अवलिया शिक्षकाचा परिचय
श्री प्रविणकुमार भिमराव शिंदे
उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मळई वस्ती.  ( 9665804001 / 9359514470 )
● अहमदनगर येथील आनंद ऋषी हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येणारा समाज गौरव पुरस्कार सरांच्या कार्याचे कौतुक करत आहे .

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा : पुष्प तिसरे – वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास करणारा एक अवलिया शिक्षक श्री.समाधान शिकेतोड

Leave a Reply

Your email address will not be published.