शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार..

| इंदापूर / महादेव बंडगर | शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथील सरपंच व ग्रामसेवक नियमबाह्य पध्दतीने कामकाज करत असल्याच्या कारणावरून सरपंचाना अपात्रतेच्या कारवाईची व ग्रामसेवकांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विजयकुमार परीट यांनी बजावली आहे.

ग्रामपंचायत शिंदेवाडी कार्यक्षेत्रामध्ये खडीक्रशर सुरु करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. या खडी क्रशर साठी सरपंच व ग्रामसेवक यांनी ना- हरकत दाखला दिलेला आहे. सदरचा दाखला शासन नियमाप्रमाणे देण्यात आलेला नाही . सदर खडी क्रशरमुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे व शेतकऱ्यांच्या पीकाची खूप मोठी हानी होणार आहे. त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी चुकीचे व बेकायदेशीर काम करुन सर्व यंत्रणा कामास लावणाऱ्या सरपंच श्री. सावता कृष्णा बोराटे यांचेवर पदावरुन हटविण्याची कारवाई करण्याबाबत शिंदेवाडी ग्रामस्थांनी ७ सप्टेंबर २०२० व २५ सप्टेंबर २०२० रोजी गटविकास अधिकारी इंदापूर यांना पत्रव्यवहार केला होता ; कारवाई न केल्यास दि. २८ सप्टेंबर २०२० पासून ग्रामपंचायत शिंदेवाडी कार्यालयास टाळे ठोकून कामकाज बंद ठेवणार आहेत असे शिंदेवाडी ग्रामस्थ यांनी गटविकास अधिकारी इंदापूर यांना कळविण्यात आलेले आहे.

त्या अनुषंगाने ग्रामपंचायत शिंदेवाडीचा पदभार असलेले ग्रामसेवक श्री.आय.एस. शेख यांनी या प्रकरणात ग्रामपंचायत मार्फत कोणत्याही प्रकारचे दाखले, ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी देतेवेळी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमातील तरतूदी विचारात घेऊन दाखले, ना-हरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे होते. सचिव म्हणून ग्रामसेवक श्री. शेख यांनी सदरचा विषय मासिक सभा सूचना पत्रामध्ये घेऊन , मासिक सभेपुढे ठेवून सभेमध्ये सदर विषयावर सविस्तर चर्चा करून मासिक सभेच्या मान्यते नंतरच ना-हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते. परंतु त्यानुसार ग्रामसेवक श्री. शेख यांनी कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही . सदरची बाब नियमबाहय असून गंभीर स्वरुपाची असून कार्यालयीन शिस्तीस सोडून असल्याचे गटविकास अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस मध्ये म्हटले आहे.

ग्रामसेवक श्री. शेख यांनी नियमबाह्य पध्दतीने ना-हरकत प्रमाणपत्र देणे, शासकिय कामकाजामध्ये हलगर्जीपणा करणे, सचिव पदाच्या कर्तव्यात कसूर करणे आदी आरोपांचा आठ दिवसात समर्पक खुलासा न केल्यास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपिल (वर्तणूक) नियम १९६७ या तरतूदी नुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे गटविकास अधिकारी इंदापूर यांनी म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमातील तरतूदीनुसार सरपंच श्री. सावता कृष्णा बोराटे यांनीही वरील सर्व गोष्टींमध्ये सहभाग घेऊन पदाचा दुरुपयोग केला आहे.त्यामुळे 2 दिवसांत त्यांनी समर्पक खुलासा न केल्यास त्यांच्यावर देखील अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल असे गटविकास अधिकारी इंदापूर यांनी सांगितले आहे.

त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवक आता कोणत्या बाबींचा आधार घेऊन केलेल्या बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन करणार की वरिष्ठांच्या कारवाईला सामोरे जाणार याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.