श्रीकृष्ण : एक भावना

श्रीकृष्ण कसा याबद्दल अनेक मतप्रवाह.. गोकुळातल्या समस्त गोपिकांना रिझवायला तो नंदलाला, कन्हैय्या झाला.. लहानमोठी प्रत्येक स्त्री त्याच्या बाललीलात रंग़ुन गेली.. पुत्रप्रेम.. बालमित्राचं प्रेम.. तारूण्यातला उत्फ़ुल्ल जोश यांचा रसरसुन आनंद घ्यायला शिकवले या श्रीरंगाने..

रासलिला मध्ये रमणारी प्रत्येक गोपी निश्चितच विसरली असेल ती रास रचताना आपल्या दु:खाला.. आपल्या विवंचनेला.. एक फ़ुंकर ठरली असेल ती तिच्या दु:खावर.. एक खळाळता उत्साह आला असेल तिच्यात.. तिच हरवलेल बालपण कदाचित हरवलेल तारुण्यही गवसलं असेल तीला त्या कृष्ण क्रीडामध्ये..

स्वतंत्र ओळख ..एक स्वातंत्र्य .. प्रत्येक व्यक्तीची एक स्व:तांची ओळख एक स्वतंत्र स्पेस असते.. या सगळ्या कुटुंब, संसार समाजा पलिकडेही हीच जाणिव दिली त्या अबोध गोपिकांना श्रीकृष्णाने.. जेव्हा जेव्हा त्या रास क्रीडेचा विचार करते त्यावेळेस मला श्रीकृष्णचे ते केवळ रमणे , किंवा खेळ हे जाणवतच नाही मला दिसते त्या पाठची प्रत्येकीची स्पेस जपण्याची भावना.. त्या रासरंगात कुठलीही शारीरीक आसक्ती नव्हती तर परमात्म्याशी आत्म्याचे तादात्म्य पावण्याची भावना होती आणि असे आत्म्याचे परमात्म्यात तादात्म्य पावले की मग भौतिकतेच्या पलिकडे जाउन अंतरात्मा परमात्म्यात सामावल्याने संपूर्ण भानविरहीत असे होऊन जात. केवळ ग़ोपिकाच नव्हे तर त्याचे सवंगडी गोप देखिल त्याच्या समवेत यमुनेकाठी क्रिडा करीत असोत वा दह्या हंड्या फोडून दही खात असोत अगदी तन्मयतेने त्याच्या समवेत समरसून त्याचा आंनद घेत.

तो मुरली मनोहर आपल्या बासुरीवर सुरेल ताना घेऊ लागला की भोवतालचे संपूर्ण चराचर अमृतानुभव घेत आणि त्या सुरामृतात तल्लीन होऊन आत्मभान विसरून त्या परमात्म्याच्या सुरेल उत्सवात सामावून जात त्याचा खोडकरपणा ही हेच दाखवतो.. प्रत्येकाच्या मनातल्या सुप्त बालमनाला त्याने कुठेतरि जागते ठेवले .. त्याच्या खोड्याना लटके रागवतानाही त्या खोड्या हव्या हवयाश्या होत्याच ना प्रत्ये़कीला.. यशोदे बाबतीतही हेच जन्मतःच तीने तिच्या कन्येला गमावले पण ते अपत्य विरहाचे दु:ख जाणवु दिले नाही कन्हैयाने तिला. तिलाही नाही आणि नंद राजालाही नाही.. हि स्त्री मनाची जपणुक मला सातत्याने दिसते कृष्णा मध्ये…

मग तो संदर्भ अगदि कुब्जेचा असलतरी त्यामागे श्रीकृष्ण मला जाणवतो ते एक विचार म्हणुन… तिच्या कुरुपतेतीलही तिचे सुरुप मन ओळखले त्याने… आणि त्यानेच.. कुरुपता ही पुर्णपणे कुरुपता नसतेच त्यातही कुठेतरी सुरुप, स्वरुप असतेच. सत्यभामा किंवा रुख्मिणी मानवी स्त्री सुलभ भावनाचा अविष्कार पण त्या दोघीनाही सांभाळताना त्याने साधलेला समतोल शिकवुन जातो समतोल वृती.. प्रत्येकीचा हट्ट पुरवणार तो पती.. कितीतरी रुपे त्याची द्रौपदीचा सखा.. तिच्या धाव्यावर तीचे पती देखील खाली मान घालुन बसलेले असताना.. तिचे स्वत्व जपायला पुढे आला फ़क्त तोच.. तीचा कृष्णसखा.. तिची थाळि .. तिची काळजी पुर्ण केली त्याने.. तिच्या अस्मितेला.. तिच्या भावनाना जपले त्याने कायम आणि प्रत्येक स्त्रीला हवी असते अशीच एक पाठीशी राहाणारी.. कायं जपणारी भावना ती स्वत: जरी कणखर असली तरी तिच्या कणखरतेला अजुन कणखर करणारी.. तिच्या विचारांना धार देणारी ही बळकट भावना आणि ती भावना म्हणजे कृष्ण.. मग मीरेच्या निष्काम भक्तीला ओ देणारा कृष्ण असो किंवा मधुरा भक्तीत रंगलेला श्रीरंग असो.. दोन्ही रुपे स्रीच्या जवळचीच. निष्काम निष्कलंक प्रेम, निष्काम भक्ती म्हणजे फक्त श्रीकृष्ण… स्त्रीचं सगळ्याच अर्थाने स्वातंत्र्य जपलेले दिसते मला कृष्ण चरित्रात… अध्यात्म भावनांचा रसपरिपोष आढळतो ठायी ठायी… प्रत्येक आत्म्याच्या ठायी असलेली उपजत ओढ, उर्मी जागवलीये त्या माधवाने सतत.. मग तो अर्जुनाला गीता सांगुन सत्याबाबत कणखर व खंबीर रहाण्या साठी केलेला यत्न असो वा सत्याची बाजु सावरण्यासाठी कधीतरी युक्तीने केलेला सामना असो..

मी जेव्हा जेव्हा विचार करते श्रीकृष्णाचा तेव्हा मला जाणवते व्यक्तीपेक्षाहि ती एक भावना.. कृष्ण एक भावना आहे. प्रत्येक स्त्रीचा पाठीराखा आहे तो.. ती भावना त्या कोवळ्या बालमनाला फ़ुलायला शिकवते तारुण्यातल्या भावनांना हळुवार खुलवते.. वेदनांमध्ये ही सुखावते.. ह्या संसाराच्या तापातही एक शीतल झुळूक होते व अवकाश आहे स्वतंत्र तुझे ह्याची जाणिव प्रत्येकीला करुन देते तुझ्या पाठी माग़े मी सदैव आहेच.. हा विचार कृष्ण मला कायम देतो..कृष्ण…माझ्यासाठी एक भावना.. अगदी बालवयापासुन.. पावलापावला वर साथ करणारा माझा सखा… माझा दिपस्तंभ..

– स्मिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *