शरद पवारांचे राज्यपालांना खरमरीत पत्र..!

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवलं आहे. या पुस्तकाला अभिप्राय देताना खरमरीत पत्र लिहिलं आहे आहे. महत्वाचं म्हणजे शरद पवार यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्षतेची आठवण करुन देण्यासंबंधी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत टोला लगावला आहे.

शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे की, “भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपददस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत”.

“तसंच निधर्म वादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही,” अशी आठवण करुन देत शरद पवारांनी टोला लगावला आहे.

काय आहे प्रकरण?
राज्यातील मंदिरं बंद असण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवलं आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही अयोध्येलाही गेला होता.

तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. या पत्राला उद्धव ठाकरे यांनी दिलेलं उत्तरही चांगलंच गाजलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही मी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसून स्वागत करत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या पत्राला उत्तर दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *