शरद पवारच सरकार चालवतात, राज ठाकरेंच्या राज्यपाल भेटीवरून चंद्रकांत पाटलांचा उध्दव ठाकरे यांना टोला..!

| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वीजबिलांसंदर्भात झालेल्या या बैठकीत राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात चर्चेत असलेल्या वीजबिलांच्या प्रश्नावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपालांनी शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिला आहे, असं राज ठाकरे यांनीच माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्याचबरोबर गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेईल, असंही राज ठाकरे म्हणाले होते.

राज्यपाल व राज ठाकरे यांच्या भेटीतील याच मुद्यावरून सांगली दौऱ्यावर असलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले,”राज्यपाल काय म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणत्या हेतूनं म्हटले तेही माहिती नाही. पण मला विचाराल, तर आता सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. उद्धवजींना भेटून काय उपयोग आहे? एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर शरद पवारांना भेटावं लागेल. कारण उद्धवजी ना प्रवास करतात. ना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे लोकांचं म्हणणं ऐकतात. आता मंदिराचं. महाराष्ट्रातील २५ मोठ्या मंदिरांची व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे मीटिंग घ्या. सहा सहा महिने मंदिर बंद असल्यानं भक्त जी दक्षिणा टाकतात, ती बंद आहे. कर्मचाऱ्याचे पगार सुरू आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. अनेक मंदिर खूप सामाजिक कामं करतात. त्यांची गंगाजळी संपत चाललेली आहे. हे समजून घ्यायला पण त्यांना वेळ नाही. मग लोकांना देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक असं म्हणतात की, त्यांना भेटून घ्या. गेल्या आठ नऊ महिन्यात माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर आलेलं नाही. त्यामुळे जर अशी भावना निर्माण झाली. राज्यपालांनी काय म्हटलं मला माहिती नाही. पण, ही वस्तुस्थिती आहे. उद्धवजींनी मी इथे बसतो, चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या, असं केलेलं दिसतं,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *