श्रीलंकेत पुन्हा राजपक्षे सरकार..!

| कोलंबो | भारताचं शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला बहुमत मिळालं आहे. आज आलेल्या निकालांमध्ये श्रीलंकेतील २२५ जागांपैकी केवळ श्रीलंका पीपल्स पार्टीनं १४५ जागांवर विजय मिळवला. तर सहकारी पक्षांसोबत त्यांचा एकूण १५० जागांवर विजय झाला आहे. पक्षाला एकूण ५९.९ टक्के मतं मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राजपक्षे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी काम केलं जाणार असल्याचंही मोदी म्हणाले. राजपक्षे यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. “फोनवरून अभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. श्रीलंकेतील नागरिकांच्या सोबत दोन्ही देशांमधील अनेक वर्षांपासून असलेले उत्तम संबंध आणि सहकार्य यांना पुढे नेण्यास एकत्र काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. श्रीलंका आणि भारत हे चांगले मित्र आणि उत्तम सहकारी राष्ट्र आहेत,” असंही ते म्हणाले.

महिंद्रा राजपक्षे यापूर्वी दहा वर्षे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षही होते. परंतु पक्षातील विरोधामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. परंतु त्यानंतर त्यांचे बंधू राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. यावर्षी निवडणुकीपूर्वी श्रीलंका पोदुजना पार्टीनं (एसएलपीपी) संविधानात बदल करण्याचा अजेंडा हाती घेतला होता. यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ वाढवणं, देशातील काही कायद्यांमध्ये बदल करणं आणि अन्य बाबींचा समावेश होता. दरम्यान राजपक्षे हे चीन समर्थक नेते म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *