शिवसेनेचे नेते व कार्यतत्पर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, शिंदेंना किरकोळ दुखापत..!

| मुंबई | राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारला वाशी टोलनाक्याजवळ अपघात झाला असून या अपघातात शिंदे थोडक्यात बचावले आहेत. गुरुवारी रात्री मुंबईच्या दिशेने येत असताना वाशी टोलनाका ओलांडल्यानंतर काही अंतरावरच हा अपघात झाला. अपघातात शिंदे यांच्या हाताला मार लागला व अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या कारला अपघात :

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आपल्या टोयटा एसयूव्ही गाडीने गुरुवारी मुंबईला चालले होते. वाशी टोलनाका ओलांडल्यानंतर शिंदे यांच्या कारला अपघाताला सामोरे जावे लागले. या अपघातात सुदैवाने शिंदे यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. शिंदे यांच्या हाताला किरकोळ मार लागला असून अंगठ्यालाही दुखापत झाली आहे. अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता उत्तम आहे व काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कुणी षडयंत्र रचतंय का?

एकनाथ शिंदे यांचा फोटो तांदळात ठेवून जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कऱ्हे तलावली गावात घडला होता. याप्रकरणी कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी या दोन जणांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर शिंदे यांच्या समर्थकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. हा केवळ जादूटोण्याचा प्रकार आहे की यामागे काही षडयंत्र आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यायला हवा अशी मागणी शिंदे समर्थक राम रेपाळे यांनी केली होती. राजकीय स्पर्धेतून हा जीवाशी खेळ तर सुरू नाही ना, असा संशयही त्यांनी घेतला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या कारला अपघात झाल्याने त्यांचे कार्यकर्ते चिंता व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *