शासन निर्देशानुसार सोयी न मिळाल्यास पुरंदर मधील शिक्षक संघटनांचा कुटुंब सर्वेक्षणास असहकार..

| पुणे / विनायक शिंदे | माझे कुटुंब , माझी जबाबदारी योजनेमध्ये पुरंदर तालुक्यात कुटुंब सर्वेक्षणाचे कामकाज शासन निर्देशानुसार होत नसल्याने पुरंदर तालुक्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून यापुढे कुटुंब सर्वेक्षणात शिक्षकांचा असहकार असेल असे निवेदन तालुक्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी पुरंदर कोविड प्रशासनाला दिले आहे.

पुरंदर तालुक्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे सर्वेक्षण करताना पथकामध्ये आरोग्य कर्मचारी किंवा आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असावेत. स्वयंसेवक प्राप्त न झाल्यास त्याऐवजी एक आरोग्य कर्मचारी व आशा देण्यात यावी असे शासन आदेशात स्पष्ट म्हटले आहे.असे असताना पुरंदर तालुक्यात फक्त शिक्षकांनाच या सर्वेक्षणाची संपूर्ण जबाबदारी दिलेली होती , मात्र शिक्षकांना पंधरा-वीस मिनिटांचे प्रशिक्षण देऊन इन्फ्रारेड थर्मामीटर व पल्स ऑक्सीमीटर हाताळणे व वापराबाबत परिपूर्ण माहिती झालेली नाही. तरी देखील प्रशासनाने हे सर्वेक्षण केवळ शिक्षकांचे मनुष्यबळ जास्त प्रमाणात विनासायास उपलब्ध होते म्हणून शिक्षकांद्वारे केले. त्यामुळे हे सर्वेक्षण वस्तुनिष्ठ व पारदर्शकपणे झालेले नाही.

अनेक ठिकाणी इन्फ्रारेड थर्मामीटर व पल्स ऑक्सीमीटर नादुरुस्त होताना आढळले. गृहभेटीसाठी प्रत्येक टीम मध्ये एक आरोग्य कर्मचारी, दोन स्वयंसेवक असे तिघांचे पथक असावे असा आदेश असताना अनेक ठिकाणी एकाही गावातील किंवा शहरातील पथकामध्ये आरोग्य कर्मचारी नेमला नाही. तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षक ऑक्सीमीटर व थर्मामिटर बाबत अनभिज्ञ असून देखील ते चालवण्यास सांगितले.

पन्नास वर्षावरील शिक्षक, गंभीर आजारी, बीपी, शुगर, आजारग्रस्त शिक्षक, गरोदर माता, स्तनदा माता महिला यांनादेखील आदेश देण्यात आले. त्यांना यापुढे या कामातून वगळण्यात यावे. पथकामध्ये आरोग्य कर्मचारी व स्थानिक स्वयंसेवक दिलेले नव्हते. पथक काम करताना ५० पेक्षा जास्त घरांना भेटी देण्याचे नियोजन केले होते.कॉमाब्रीड रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी सर्व औषधे रुग्णांपर्यंत पोहोचत नाहीत. गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथकामध्ये कोविड १९ प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक साहित्य मास्क, सॅनिटायझर , हॅण्डग्लोज, पुरवण्यात आलेले नाही. या सर्वांबाबत शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये सर्व शिक्षकांच्या संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येत आज याबाबत कार्यवाही न झाल्यास कुटुंब सर्वेक्षण कामकाजाबाबत असहकार केला जाईल असे निवेदन पुरंदरच्या तहसीलदार व उपविभागीय अधिकारीव तहसीलदार पुरंदर यांना देण्यात आले.

यामध्ये पुरंदर तालुका प्राथमिक, माध्यमिक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर अशा सुमारे पंधरा शिक्षक संघटना एकत्र येत निवेदन दिलेले आहे.

✓ आम्ही शिक्षक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. त्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. कोणत्याही सुरक्षिततेच्या साधनाशिवाय, कोणाचीही वाट न पाहता. “जिथे कमी.. तिथे आम्ही” या कर्तव्ये भावनेतून संकटकाळी पुरंदरचे शिक्षक नेहमीच दोन पाऊल पुढे असतात. याचा कोठेही उल्लेख होत नाही. कोरोनाचा धोका, संसर्ग असून देखील आमचे शिक्षक जीवाची पर्वा न करता. राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र शिक्षकांची सातत्याने मानहानी होती होते.
– संदीप कदम, शिक्षक नेते, पुरंदर.

✓ आजकाल शिक्षकांना सर्वत्र फक्त राबवून घेण्याचे काम चालू आहे आणि शिक्षक बिचारा सगळे सहन करत आहे. इतर नोकर्‍यांना त्यांच्या जाॅबचार्ट पुरतेच काम करावे लागते. पण शिक्षकांना सगळ्या यंत्रणा स्वत:च्या हाताचे खेळणे समजतात.कोणी आवाज केला तर दाबला जातोय.
– नंदकुमार सागर, सचिव, माध्यमिक शिक्षक संघटना

✓ सर्वे करणार्या सर्वच कर्मचार्यांचे प्रथम चेकअप करुन सर्वेला पाठवणे गरजेचे असताना याची दक्षता घेतली जात नाही.
– मधुबाला कोल्हे, अध्यक्षा, पुरंदर तालुका शिक्षक समिती

✓ सर्वे करताना अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली. शिक्षकांनी स्वतः यासाठी उपचार केले त्यासाठी खर्च केलला रकमा मिळाव्यात.
– महादेव माळवदकर, राज्य संपर्कप्रमुख – शिक्षक समिती

✓ शिक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार शिक्षक ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण देत आहेत. याबाबत ऑनलाईन माहिती भरणे चालू आहे त्यामुळे शिक्षकांना सर्वे करण्यात गुंतवू नये.
– गणेश लवांडे, अध्यक्ष पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ

✓ केंद्रप्रमुखांना देखील नाईट ड्युट्या दिल्या आहेत त्यादेखील रद्द व्हाव्यात.
– राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष, केंद्रप्रमुख संघटना..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *