शिवसेनेने दिलेला शब्द पाळला..! भाविकांकडून स्तुती..!

| मुंबई | उत्तर प्रदेशच्या अयोध्येत ५ ऑगस्टमध्ये राम मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. या भुमिपुजनाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी १ कोटी रुपयांची घोषणा आधीच केली होती. पण ही रक्कम राम मंदिर ट्रस्टला मिळाली नसल्याचा दावा तिथल्या महंतांनी केला होता. या पार्श्वभुमीवर १ कोटी रुपये दिल्याची माहिती शिवसेना नेते अनिल देसाई यांनी दिली.

शिवसेनेने पैसे देण्याचे वचन दिले होते मात्र आतापर्यंत पैसे मिळाले नसल्याचे महंत नृत्य गोपाल दास यांनी म्हटले होते. याला अनिल देसाईंनी उत्तर दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी ६० व्या जन्मदिवशी २७ जुलैला ही रक्कम श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात टाकण्यात आल्याचे देसाई म्हणाले. ही रक्कम मिळाल्याची माहिती देखील आमच्याकडे आल्याचे देसाई म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मार्च २०२० मध्ये अयोध्या यात्रे दरम्यान मंदिर निर्माणसाठी शिवसेनेकडून एक कोटी देण्याचे वचन दिले होते.

पंतप्रधानांचा असा आहे कार्यक्रम (रोडमॅप) :
राम मंदिर भुमिपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोडमॅपविषयी देशभरात चर्चा सुरु आहे. पंतप्रधान अयोध्येत पोहोचल्यावर सगळ्यात आधी हनुमानगढी मंदिरात जाऊत हनुमानाचं दर्शन घेतील. रामलल्लाच्या कामाआधी हनुमानाची परवानगी घेण्याची परंपरा अयोध्येत आहे. हनुमानगढीनंतर पंतप्रधान राम जन्मभूमी परिसरात जातील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान राम मंदिराचं भूमिपूजन करतील. रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये मंदिराचं भूमिपूजन होईल. राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. राम मंदिर निर्माणावर पंतप्रधान अयोध्येतून ऐतिहासिक भाषण करतील. याचबरोबर मोदी राम जन्मभूमी परिसरातून अयोध्येच्या विकासासाठीच्या योजनांचं लोकार्पण आणि शिलान्यास करतील. शिलान्यास केल्यानंतर पंतप्रधान काही वेळ राम जन्मभूमी परिसरात घालवतील. यावेळी ते काही प्रमुख साधू-संतांचीही भेट घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *