सचिन पायलट यांचा रुसवा दूर, पुन्हा काँग्रेस मध्ये सक्रिय

| जयपूर | मी नेहमी काँग्रेसचा भाग राहिलो आहे, त्यामुळे हे माझं कमबॅक नाही असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. पण राजस्थानमधील सरकारच्या कारभारासंबंधी आमचे जे आक्षेप आणि चिंता होती ती व्यक्त करणं गरजेचं होतं असं सचिन पायलट यांनी यावेळी सांगितलं. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘निकम्मा’ उल्लेख करत टीका केल्याने आपण दुखावलो असल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे.

“नक्कीच मी दुखवलो गेलो. मी अशा पद्धतीची टीका करण्यापासून नेहमी स्वत:ला नेहमी रोखतो. कारण लोकांना मी काय करतो हे माझ्या कामामधून दिसतं. राजस्थानमध्ये मी काय काम केलं आहे हे माझी लोक, आमदार यांनी पाहिलं आहे,” असं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे.

अशोक गेहलोत यांच्या निकम्मा टीकेवर बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी कोणाचा कितीही विरोध केला तरी अशी भाषा वापरणार नाही. कुटुंबाकडून मला तशी शिकवण मिळाली आहे. पण कामासंबंधी एखाद्या गोष्टीवर आक्षेप असेल तर मी तो नोंदवणार”. पुढे ते म्हणाले की, “ते माझे वरिष्ठ आहेत. आम्ही याआधीही एकत्र काम केलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची ही माझी पहिली वेळ नसणार आहे. मला लोकांचा किती पाठिंबा आहे याची कल्पना आहे, त्यामुळे पद मोठं असो किंवा छोटं फरक पडत नाही”.

“जयपूरमध्ये चर्चा करण्यासारखी स्थिती अजिबात नव्हती. प्रशासन आम्हाला भीती दाखवत असल्याने राज्याबाहेर जाणं गरजेचं होतं. जेव्हा तुम्हाला जीवाची भीती असते, तुमच्या ४५ आमदारांविरोधात गुन्हा दाखल केला जातो, आमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला…या सर्व गोष्टींमुळेच आम्ही रिसॉर्टमध्ये आश्रय घेतला. आम्ही कोणाकडूनही सुविधा घेत नव्हतो. आमचा खर्च आम्हीच उचलला,” असं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *