संपादकीय : महाराष्ट्राचा हिमालय एकमेवद्वितीय आचार्य अत्रे

आज आचार्य अत्रे यांच्या जन्माला १२२ वर्ष पूर्ण झाली आणि १३ जून १९६९ ला आचार्य अत्रे यांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्रासाठी धारातीर्थी पडलेल्या या महान सरसेनापतीचे पाíथव शिवशक्ती या ‘मराठा’च्या कार्यालयात दर्शनाकरिता ठेवण्यात आले होते. मराठी राज्य निर्माण होण्यासाठी आयुष्यभर लढलेल्या या महान नेत्याने बेळगाव-कारवार महाराष्ट्रात सहभागी होत नाही म्हणून आमदारकीचा राजीनामाही फेकून दिला होता.

आज अखंड महाराष्ट्रासाठी मराठी माणसांना पुन्हा लढ्याची हाक द्यावी लागते. या मुंबईतील मराठी माणसाचे आणि नेतृत्वाचे वर्चस्व कमी होताना आपण पाहतो आहोत. अशावेळी आचार्य अत्रे यांची प्रकर्षाने आठवण होते. महाराष्ट्राला दिलेला शब्द न मोडणारा आणि लिहिलेला शब्द न खोडणारा, असा हा महाराष्ट्राचा झुंजार महानायक.

प्र. के. अत्रे सक्रीय राजकारणात होते. त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलल्या, ते कायम न-नैतिक राहिले. नैतिक किंवा अनैतिक झाले नाहीत. सावरकरांविरुद्ध बोलल्यामुळे त्यांना पुण्यामध्ये रक्ताची आंघोळ घातली जाईल एवढा मार पडला, पण तेच सावरकर गेल्यावर अत्रेंनी जे अग्रलेख लिहिले ते सावरकरांवरील अक्षय मृत्यूलेख आहेत. अत्रे काँग्रेसपासून कम्युनिस्टांपर्यंत आणि समाजवाद्यांपासून जनसंघापर्यंत सर्वांशी मैत्री ठेवून होते आणि त्यांच्याशी त्यांनी टोकाचे वादही घातले. अत्रे हे खरेतर शिक्षणतज्ज्ञ. मराठी भाषाविषयक त्यांची शैक्षणिक पुस्तकं आजही वाचली, तर कुणाचीही मराठी भाषा सुधरू शकते. ते बीए, बीटी, टीडी (लंडन) हे शिक्षण पूर्ण करून मराठी भाषेचे शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करू लागले. त्यांच्या ‘नवयुग वाचनमाले’ची आजही मराठीतील कोणतंही पुस्तक बरोबरी करू शकणार नाही. मराठी भाषा, मराठी माणूस यांच्यासाठी त्यांनी राजकीय, सामाजिक लढा एकहाती पेलला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. ‘मोरूची मावशी’, ‘तो मी नव्हेच’, ‘लग्नाची बेडी’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘भ्रमाचा भोपळा’ व इतर अनेक नाटके त्यांनी लिहिली. मास्टर विनायक आणि पु. ल. देशपांडे यांनी भूमिका केलेला व अत्रेंनी लिहिलेला ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट कोण विसरेल? समकालीन साहित्यिकांबरोबरचे त्यांचे टोकाचे वाद प्रचंड गाजले. ना. सी. फडके, पु. भा. भावे ही त्याची काही उदाहरणे. परंतु नंतर ज्यांच्याशी वाद घातला, टोकाचे शत्रूत्व केले त्यांच्यांशी हात मिळवणे, निर्विषपणे मैत्री करणे हा त्यांचा स्वभाव होता आणि हा स्वभाव त्यांनी आयुष्यभर जपला.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्र. के. अत्रे हे एक प्रमुख नेते होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी परमोच्च्च बिंदूवर नेलेला हा सर्वोत्कृष्ट राजकीय लढा होता. त्यांच्या अमोघ आणि विनोदी वक्तृत्वाने शिवाजी पार्कवर त्यांनी जवाहरलाल नेहरूंपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत सर्वांना गारद केले. मोरारजी देसाई यांची भिती तर त्यांनी नष्ट केलीच, पण त्यांची एवढी भीषण टवाळी केली की, मोरारजींच्या खूनशीपणाला महाराष्ट्रात आणि मराठी मनात काही जागाच उरली नाही. सेनापती बापट हे त्यांचे अजून एक श्रद्धास्थान. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अत्रेंनी उभे केलेले ‘मराठा’ हे वृत्तपत्र, अत्रेंचे अमोघ वक्तृत्व हे वजा केल्यास संयुक्त महाराष्ट्र झाला नसता आणि मुंबई महाराष्ट्रात आली नसती, हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारणार नाही.

संपूर्ण महाराष्ट्राचे ख-या अर्थाने जनजागरण त्यावेळच्या ‘नवयुग’ आणि ‘मराठा’च्या लेखांनीच केले, हे आज महाराष्ट्र मोकळय़ा मनाने मान्य करतो. साहित्याच्या सगळय़ा निष्ठा बाजूला ठेवून आचार्य अत्रे हातात दोन दांडपट्टे घेऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या एका ध्यासासाठी अविश्रांत लढत राहिले. एक थोर नाटककार आपली नाटय़ाची लेखणी बंद करून संयुक्त महाराष्ट्रासाठी तलवार उपसून साहित्याच्या सगळय़ा निष्ठा फेकून देतो, महाराष्ट्राचा जो जो शत्रू त्याला झोडपण्यासाठी कशाचीही पर्वा करीत नाही. मग ते विनोबा असोत, स. का. पाटील असोत की, मोरारजी असोत आणि म्हणूनच ‘नवयुग’, ‘मराठा’च्या शीर्षकांनी उभा महाराष्ट्र चवताळून उठला, ते शीर्षक होते ..

‘चव्हाण-हिरे-देसाई-जनतेचे कसाई ’

‘विनोबा की वानरोबा ..’

अशी किती शीर्षके सांगता येतील.

प्रतापगडावर पंडित जवाहरलाल नेहरू येणार होते तेव्हा त्यांना काळी निशाणे दाखवण्यासाठी शिवाजी पार्कवर जी प्रचंड सभा झाली, त्या सभेतील आचार्य अत्रे यांचे शेवटचे वाक्य होते..

‘अन्यायाने संतप्त झालेल्या तीन कोटी मराठी जनतेला वाघ नखं फुटतील आणि द्विभाषिकाचा कोथळा बाहेर काढला जाईल.’ संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांनी जे जे लिहिले, तो तो घणाचा घाव होता.

‘पाताळात गाडा हे महाद्विभाषिक ’
(१२ ऑगस्ट १९५६)
द्विभाषिकाला महाराष्ट्राचे आव्हान
(३० सप्टेंबर १९५६)
द्विभाषिकांचा अमंगल आरंभ
(३० जून १९५७)
मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे
(२१ डिसेंबर १९४७)
संयुक्त महाराष्ट्राचे पुढे काय?
(६ फेब्रुवारी १९४९)
मुंबईबाबत सार्वमत मागा!
(६ नोव्हेंबर १९४९)
महागुजरातवाद्यांचा प्रचार
(१६ ऑगस्ट १९५३)
स्वतंत्र मुंबई म्हणजे गुंडराज्य
(२२ नोव्हेंबर १९५३)
व्रजाघात
(१६ ऑक्टोबर १९५५)
चौदा लाख मराठय़ांची मुंबई
(२३ ऑक्टोबर १९५५)
भर दिवाळीत मुंबईचा खून!
(१३ नोव्हेंबर १९५५)
मुंबईसाठी मराठा प्राण देईल!
(४ डिसेंबर १९५५)
महाराष्ट्रा, झगडय़ाला तयार हो!
(१५ जानेवारी १९५६)
शुरू हुवा है जंग हमारा!
(२२ जानेवारी १९५६)
एकजुटीचा गर्जा जयजयकार!
(८ जुलै १९५६)
मराठी गुजराती भाई भाई !
(१९ ऑगस्ट १९५६)
हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ न होवो!
(२० जानेवारी १९५७)
मुंबईवर महाराष्ट्राचा झेंडा
(१९ मे १९५७)
संयुक्त महाराष्ट्राचा
काळा दिवस
(४ ऑगस्ट १९५७)
‘संयुक्त महाराष्ट्र’ द्या नि मग या
(१० नोव्हेंबर १९५७)
श्री शिवछत्रपतींना अभिवादन
(६ जानेवारी १९५९)
आपल्या नव्या राज्याचे
नाव-महाराष्ट्र
(२० मार्च १९६०)
मराठीपण म्हणजे काय?
(२४ एप्रिल १९६०)
भारताचे ‘चौदावे रत्न’
(१ मे १९६०)
महाराष्ट्राची गौरवगाथा
(८ मे १९६०)

हा सगळा तपशील महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना माहीत नाही. तसेच शिवाजी पार्कला ‘शिवतीर्थ’ हे संबोधन त्यांनीच दिले. बऱ्याच जणांचा असा समज आहे की, बाळासाहेब ठाकरे यांनी हे नाव दिलेले आहे. हा समज पूर्णत: खोटा आणि निराधार आहे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र समितीचा भाग होते. बाबूराव अत्रेंबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. मुंबई महाराष्ट्रात आल्यावर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर काही वर्षांनी ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू झाले आणि त्यानंतर काही वर्षांनी शिवसेनेची स्थापना झाली.

अत्रेंनी आयुष्यात केलेल्या चुका स्वत:च लिहून मान्य केल्या आहेत. ते पराकोटीच्या टोकाच्या भूमिका घेत आणि त्या १८० अंशांमध्ये बदलतही असत. ते टोकदार आणि ठाम भूमिका घेऊन तडीला नेत असत. आयुष्यात अनेक चढउतार त्यामुळे त्यांना पाहावे लागले. त्यांनी कधीच लोकानुनय केला नाही. लोकांना आवडेल म्हणून नैतिक वागणे वा लोकांना आवडणार नाही म्हणून अनैतिकतेचा पुरस्कार करणे, हे त्यांनी कधीच केले नाही. ते खऱ्या अर्थाने एखाद्या बालकासारखे ‘न-नैतिक’ होते व आयुष्यभर तसेच राहिले.

आचार्य अत्रे कधीही बरोबर किंवा चूक नव्हते. अत्रे हे एकमेवद्वितीय होते. मराठी चित्रपटाला पहिला राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळवून देणारा चित्रपट बनवणारा माणूस, फुलेंच्या जीवनावर चित्रपट बनवून राष्ट्रपती रजत पदक मिळवून देणारा माणूस, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारा माणूस, टोकाचे प्रेम आणि टोकाचा द्वेष ज्याने झेलला तो माणूस महाराष्ट्राचा हिमालय होता. असं एखादंच क्षेत्र असेल, जे अत्रेंनी गाजवायचं ठेवलं असेल. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रेम आणि ऋण या दोन्हींची उंची इतर कुणालाच गाठता येणार नाही एवढं आहे.

अत्रेंचे लेखन, त्यांची भाषणं (मुद्रित व रेकॉर्डेड), त्यांचे सिनेमे, त्यांची नाटकं, त्यांनी केलेले वाद, त्यांनी लिहिलेले मृत्यूलेख, ठाम भूमिका घेतल्यामुळे रक्तबंबाळ होईस्तोवर त्यांनी खाल्लेला मार, संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी त्यांनी भोगलेला तुरुंगवास सगळेच अचाट असेच आहे.

या सर्व क्षेत्रात अखंड आपलाच झेंडा फडकवत ठेवणाऱ्या महाराष्ट्राच्या हिमालयाला साष्टांग दंडवत🙏🏻

प्राजक्त झावरे पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *