सावधान भिगवण ते डाळज टप्पा ठरतोय चोरांचे माहेरघर; गुन्हेगारांचे धाडस वाढतेय की पोलिसांचा दरारा कमी होतोय? याचं आत्मचिंतन करण्याची गरज..

| इंदापूर/ महादेव बंडगर | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ते डाळज नं-3 टप्प्यादरम्यान वाहनचालकांना अडवून लुटण्याचे, मारहाण करून किमती ऐवजाच्या चोऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून नेमकं चोरांचं धाडस वाढतेय की पोलिसांचा दरारा कमी होतोय हा आता आत्मचिंतनाचा विषय झाला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर डाळज नं-1 जवळ महामार्ग पोलीस चौकी आहे. सतत वाहतूक सुरू असते. शेजारी बिल्ट ग्राफीक कागद कंपनी आहे. तेथे येणारे जाणारे कामगार मोटारसायकल वरून येत असतात. सध्याएसटी बसेस तुरळक चालू असल्याने व कोरोना लॉकडाऊन शिथिल केलेले असल्याने गावापासून बरेच दिवस दूर असलेले लातूर, सोलापूर, उस्मानाबाद कडे जाणारे अनेक चाकरमानी कुटुंबियांना भेटण्यासाठी, शेतीवाडीच्या कामांसाठी रोजगार बुडू नये म्हणून संध्याकाळी कंपन्या सुटल्यानंतर गावाकडे मोटारसायकलवरून जात असतात. त्यांना अडवून लुटण्याचे प्रकार नेहमीचेच आहेत. परगावी जायचे असते. रात्रीची वेळ असल्याने अनेकजण तक्रार करण्याचे टाळत असतात. पण असे असे प्रकार सातत्याने घडताना दिसत आहेत. डाळज नं 2 च्या हद्दीमध्ये महामार्ग पोलिस चौकी आहे.रस्त्याने एखादा किंमती ऐवज जाणार असेल किंवा काहीतरी अज्ञात हालचाली घडत असतील तर पोलिसांना तात्काळ खबर लागते. एवढे पोलीस सतर्क असतात. तरीही रात्रीच्या 9.15 वा. चोर अशी चोरी कसे काय करू शकतात, असा प्रश्न रस्त्याने जाणाऱ्या – येणाऱ्या वाहनचालकांना मात्र पडू लागलाय.

त्याला कारणही तसंच काहीसं आहे. नुकतेच दिनांक 10 ऑक्टोबर रोजी डाळज नंबर 1 हद्दीमध्ये फिर्यादी समीर सुधाकरराव चामणीकर .वय 41 वर्षे, धंदा – खाजगी नोकरी, हल्ली रा. भगवती प्रेस्टीज , NDA रोड शिवणे ,पुणे. मूळ -रा 565/1 चिद्रवारनगर जुना पेडगाव रोड परभणी हे रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास डाळज नंबर 1 एक जवळून राष्ट्रीय महामार्गाने जात होते. त्याच वेळी त्यांची ह्युंडाई कार गाडी MH.12 FY 3837 ही पंक्चर झाली होती. ते गाडीचे टायर बदलत असतानाच कार जवळ अचानक पाच अनोळखी इसम आले. त्यापैकी एक इसम बुटका, जाड, कोरीव दाढी असलेला, अंगावर ग्रे कलरचा फुलबाहीचा शर्ट, वरील बटन उघडे असलेला व काळे बनियन पॅन्ट, डोळे बारीक असलेला वय सुमारे 35 ते 38 वयोगटाचा हातात लोखंडी रॉड असलेला होता. दुसरा इसम मध्यम, उंच, सडपातळ, गोरा उभट चेहरा, समोर टक्कल पडलेला, अंगावर बनियन आणि बर्मुडा असलेला व सुमारे 35 ते 38 वयोगटातील त्याच्या हातात विळा होता व इतर तीन जण हे मध्यम उंचीचे तोंडावर मास्क लावलेले पॅन्ट शर्ट घातलेले सुमारे 25 ते 30 वयोगटातील होते. गाडीच्या ठिकाणी येऊन त्यांनी हातातील रॉडने फिर्यादीच्या मांडीवर व पायावर, डोक्यावर मारून फिर्यादीस जखमी केले. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र त्यांच्या गळ्याला विळा लावून जबरदस्तीने विळयाने तोडुन घेतले तसेच फिर्यादीच्या व पत्नीच्या अंगावरील व पर्समधील एकूण 42.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 18 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 1,25,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे.

त्यावरून भिगवण पोलिस स्टेशन येथे भिगवण पो.स्टे गु.र.नं 387/2020 भादवि कलम 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा. JMFC सो. इंदापूर यांना सादर करण्यात आला आहे.पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *