संशोधन : काय सांगता, चष्मा असणाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी..?

| मुंबई / बीजिंग | जगभरात सध्या कोरोनावरील लसीकडे  डोळे लागले असताना चष्मा लावल्याने कोरोनाच्या संसर्गाला दूर ठेवता येते, असा दावा चिनी संशोधकांनी केला आहे. ”जामाऑफ्थामॉलॉजी’ या वैद्यकीय विषयाला वाहिलेल्या मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. दररोज चष्मा लावल्याने कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते, असे यात म्हटले आहे. यासाठी संशोधकांनी हुबेईतील २७६ कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण केले.

दररोज आठ तासांपेक्षा जास्त वेळ चष्मा लावणाऱ्यांचा अभ्यास यातून करण्यात आला. २७६ रुग्णांपैकी १६ जण (सहा टक्क्यांपेक्षा कमी) रोज जास्त वेळ चष्मा लावत असल्याचे निदर्शनास आले. त्या सगळ्यांमध्ये लघुदृष्टिदोष होता. याची तुलना हुबेई प्रांतातील अन्य लोकांशी केली असता दृष्टीदोषाचे प्रमाण ३१.५ टक्के एवढे आढळले. म्हणजेच सामान्य नागरिकांपेक्षा दृष्टीदोष असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होते.

या अभ्यासाला मात्र मर्यादा :

हे संशोधन कमी लोकांवर केले असून, ते एकाच ठिकाणी केले आहे. चष्मा वापरणाऱ्यांची संख्या ही पूर्वीच्या अभ्यासावर आधारित आहे. आताच्या स्थानिक पातळीवरील संख्या गृहीत धरलेली नाही. लघुदृष्टी असलेल्यांचे प्रमाण निश्चित करताना दृष्टिदोष असूनही चष्मा न वापरणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली असली तरी ती मर्यादित स्वरूपात आहे. हा अभ्यास कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात केला आहे.

दरम्यान, ”हा अभ्यास प्राथमिक पातळीवर झाला असून, त्याबाबत खात्रीशीर माहिती देता येणार नाही. या निष्कर्षाला पर्याय असू शकतात. उदा. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी चष्म्याबरोबरच अन्य अज्ञात व दुर्लक्षित राहिलेल्या घटकांचाही वापर केला तर उपयुक्त ठरू शकेल, असे मत ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन’च्या साथरोग विशेषज्ञ डॉ. लिसा एल. मार्गाकिस यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *