हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे की जनाब बाळासाहेब ठाकरे..? नव्या कॅलेंडर मुळे शिवसेना पुन्हा भाजपकडून ट्रोल..!

| मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाआघाडीचं सरकार आल्यापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल देत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. ‘आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही’, असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. पण त्यानंतर दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजना स्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते प्रकरण शांत होत असतानाच आता एका कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

कॅलेंडरमध्ये नक्की काय आहे?

भाजपाच्या काही नेत्यांनी आज एका कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं लिहिलं आहे. कॅलेंडरच्या वरच्या दोन कोपऱ्यांमध्ये शिवसेना आणि युवासेना असंही नमूद करण्यात आलं आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे हे कॅलेंडर मराठी, इंग्रजी याचसोबत उर्दू भाषेतही आहे. कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कॅलेंडरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुहृदयसम्राट ही पदवी हटवून त्याजागी जनाब बाळासाहेब ठाकरे असा नामोल्लेख करण्यात आला आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या नावांबाबतची असंच करण्यात आलं आहे.

कॅलेंडरवरील अशा काही गोष्टींमुळे भाजपाकडून शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. “हिंदुह्रदयसम्राट ते ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’! अजान स्पर्धेनंतर शिवसेनेच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मा. बाळासाहेब ठाकरे मा. उद्धवजी ठाकरे यांचे त्यांच्या “खास शैलीत” अभिनंदन करत असतील!”, असा टोमणा भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी लगावला आहे.

दरम्यान, याच कॅलेंडरचा फोटो भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही पोस्ट केला आहे. या फोटोतील कॅलेंडरवर त्यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही….’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *