हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा..!

| पुणे | मराठा आरक्षणाचा प्रश्न रविवारी पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी रविवारी पुणे येथे दिली. या मोर्चात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, तरुण, महिला, शेतकरी सहभागी होणार आहेत.

पुण्यातील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे मराठा, आरक्षण स्थगिती, शैक्षणिक प्रवेश, नोकरभरती, समांतर आरक्षण आणि अन्य मागण्यांबाबत पुढील आंदोलन ठरवण्याच्या दृष्टीने राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि मराठा समाजाच्या विविध संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते बोलत होते. बैठकीस तुषार काकडे, धनंजय जाधव, सचिन मोरे, संजीव भोर (पुणे), रवी माने, माउली पवार ( सोलापूर), गंगाधर काळकुटे (बीड), वीरेंद्र पवार, राजन घाग, अंकुश कदम, प्रफुल्ल पवार ( मुंबई), दिलीप पाटील (कोल्हापूर), प्रशांत पाटील, डॉ. संजय पाटील ( सांगली), रवी पाटील (औरंगाबाद), तुषार जगताप, रवी सोलकर (नाशिक), उदय पाटील ( लातूर), सुहास सावंत ( सिंधुदुर्ग), विनोद साबळे (रायगड), संजीव भोर ( अहमदनगर ) उपस्थित होते.

१ व २ डिसेंबरला महावितरण कार्यालयासमोर आंदोलन
एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महावितरण भरती प्रक्रियेवेळी सामावून घेणार अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घेतली हाेती. परंतु भरती प्रक्रियेत एसईबीसी प्रवर्गातील मुलांना डावलण्यात आले. त्यामुळे वगळलेल्या मुलांच्या पालकांसमवेत प्रत्येक जिल्ह्यात महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमाेर एक आणि दोन डिसेंबर रोजी निदर्शने करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे, असे कोंढरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *