” हे प्रेम कोणता नेता देतो का..?” एका शिवसैनिकाचे हृदयस्पर्शी पत्र..!

| ठाणे | कोणत्याही संकट काळात पुढे येऊन काम तडीस नेण्यासाठी शिवसैनिक नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना संकटकाळात देखील जनसामान्यांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करण्यात शिवसेना पक्ष आघाडीवर आहे. त्यातून अनेक शिवसेनेचे संघटनात्मक नेते कोरोना बाधीत झाले, काहींचा यात दुर्दैवी मृत्यू देखील झाला. परंतु हे व्रत यांनी सोडले नाही..

कल्याण, ठाणे शिवसेनेतील बरेच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कोरोनाने बाधीत झाले. परंतु या सर्वांची आपल्या कुटुंबप्रमाणे काळजी शिवसेनेचे नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. प्रत्येकाच्या रिपोर्ट वर लक्ष देवून सगळ्या डॉक्टरांशी बोलून सर्व मदत देखील करण्यात आली. स्वतः एकनाथ शिंदे सर्वसामान्य लोकांसाठी दिवस रात्र कष्ट करत असताना देखील आपल्या पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या हातांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्यांमागे देखील ते खंबीर उभे राहिले. शिवसेना हा पक्ष नाही तर एक कुटुंब आहे, ही आत्मीयता स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नंतर तितक्याच ताकदीने एकनाथ शिंदे यांनी जपली आहे. म्हणूनच तर ठाण्यातील शिवसेना एक बळकट किल्ला बनला आहे. याच नात्याची वीण अधिक स्पष्टपणे या पत्रातून उलगडत आहे. शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी यांचे हे पत्र प्रचंड व्हायरल होत आहे.

आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

आपण मी कोरोना सारख्या आजाराने रुग्णालयात दाखल असताना, उपचार घेत असताना माझ्या सारख्या एका सामान्य शिवसैनिकाची आस्थेने चौकशी मीरा हॉस्पिटलच्या डॉ. गौतम गणवीर यांच्याकडे केलीत आणि मी भारावून गेलो. खरं म्हणजे आपण एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माझी चौकशी केलीत याबद्दल मला कोणताही आनंद झाला नाही. परंतु आपण माझ्या शिवसेना पक्षाचे प्रमुख माझे कुटुंब प्रमुख म्हणून आपण माझी डॉक्टरांकडे चौकशी केली यांचा मला फार आनंद झाला.

आपला एका सामान्य शिवसैनिकापोटी असलेला जिव्हाळा, प्रेम व आत्मियता प्रकट झाली. साहेब हा जिव्हाळा प्रेम, आत्मीयत्ता शिवसेनेशिवाय अन्य कोणत्याही पक्षात औषधालाही मिळणार नाही आणि म्हणूनच “मातोश्रीवर” व शिवसेनेवर आम्ही आमचे प्राण पण द्यायला तयार असतो. आपला मृदू स्वभाव, प्रेम जिव्हाळा मी कायम माझ्या स्मरणात ठेवेल. म्हणूनच गेली ५८ वर्षे आम्ही शिवसेनेचे कार्य कोणतीही अपेक्षा न ठेवता करीत आहोत.

साहेब, आदरणीय श्री. एकनाथ शिंदे साहेा बद्दल काय बोलाये, शब्द कमी पडतील. कोव्हीड पेशंटला बघायला, त्यांच्या जवळ त्यांचे घरेच कधी येत नाही. परंतु आदरणीय श्री. एकनाथ शिंदे साहेब पी पी लिट घालून माझ्या जवळ आले. माझ्या डोक्या वरून प्रेमाने हाथ फिरवला मला काळजी करु नको, मी आहे असे म्हणाले. ही माया, हे प्रेम कोणता नेता देतो का?

त्यांनी अतिशय महाग औषध तात्काळ उपलब्ध करुन दिली. एवढी महागडी औषध उपलब्ध करुन देऊन आस्थेने रोज फोन वर चौकशी करणारे शिंदे साहेब मला देवदुता सारखेच जाणवले.

तसेच शिवसेना सचिव, खासदार श्री. अनिल देसाई रोज दोन दिवस माझी आस्थेने चौकशी करीत आहेत. साहेब, शिवसेनेची आम्ही सेवा करतो ही आमची पुर्वाजन्मीची पुण्याई आहे. हा पक्ष नाही ही आमची मायमाऊली आहे आणि साहेब आपण आम्हावर पितृवत प्रेम करणारे कुटूंबप्रमुख आहात.

मा. उद्धवसाहेब, मा. शिंदे साहेब, मा. अनिल देसाई साहेब आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !

आपला नम्र,
विजय साळवी, कल्याण

आणि एक राहील…..
शिंदे साहेब एका आत्मीयतेने माझ्या आईला, माझ्या मुलीला पण पहायला गेले. हे उपकार कसे विसरु.?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *