५० वर्षाची परंपरा कायम, या गावात यावेळी देखील ग्रामपंचायत बिनविरोधच..!

| सातारा | खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच बिनविरोध झाली. तीन प्रभागांमधून सात सदस्य निवडण्यात येणार होते. हरीष पाटणे, आनंदराव मोरे व मुंबईकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी बैठक घेऊन सात सदस्यांची बिनविरोध निवड केली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सातही उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केले. गत 50 वर्षांपासून बिनविरोध निवडणूक करणारे सातारा जिल्ह्यातील पहिले गाव होण्याचा मान वाण्याचीवाडी ग्रामपंचायतीने मिळवला.

वाण्याचीवाडी येथील चौणेश्वर वार्ड क्र 1 मधून संदीप भिलारे (सर्वसाधारण पुरुष), रत्नमाला महाजन (ओबीसी महिला), रत्नमाला मोरे (सर्वसाधारण महिला) हनुमान वार्ड क्र .2 मधून शंकर पाटणे (सर्वसाधारण पुरुष), विजया भिलारे (सर्वसाधारण महिला) लक्ष्मीनारायण वार्ड क्र .3 मधून प्रिया भिलारे (सर्वसाधारण महिला), सतिश महाजन (ओबीसी पुरुष) अशा सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

विरोधी अर्ज दाखल न झाल्याने वाण्याचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. सर्वानी उमेदवारी दाखल केल्यानंतर पंचायत समितीच्या प्रांगणातील स्व . यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. गावची एकजुटीची परंपरा राखत गावच्या विकासासाठी एकदिलाने काम करू, अशा प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केल्या.

बिनविरोध ग्रामपंचायतीचे व मार्गदर्शकांचे विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. मकरंद आबा पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन बकाजीराव पाटील, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, जि. प. सदस्य मनोज पवार, पं. स. सदस्या अश्विनी पवार यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *