आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

ठाणे :- नाशिकमधील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आज पक्षप्रवेश झालेल्यामध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णूपंत बेंडकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. तर त्यांच्याशिवाय उबाठा उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाठा युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये, सरपंच रमेश भोये, दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातभाई, सचिन कर्डीले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी बोलताना, विलास शिंदे यांच्याकडे मी लग्नाला गेलो तेव्हापासून मला त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार असा प्रश्न प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विचारत होते. मात्र त्यांनी आजचा दिवस निवडला. आज त्यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्याने नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल अशी खात्री वाटत असल्याचे सांगितले.

आज विलास शिंदे यांचा पक्षप्रवेश होत असताना काहींनी सकाळी बोलताना कोण विलास शिंदे असा प्रश्न विचारला..? अयोध्येत जाताना त्यांना सोबत विलास शिंदे हवा होता, निवडणुकीत काम करताना विलास शिंदे हवा होता, वारंवार आपल्याला एकत्र काम करायचे आहे असं त्यांना सांगितले जात होते. मात्र आता इथे पक्षप्रवेश करणार हे निश्चित झाल्यावर कोण विलास शिंदे असे विचारले जात आहे..? असेच धोरण राहिले तर एक दिवस तुम्ही कोण..? असा प्रश्न लोकं विचारल्याशिवाय राहणार नाहीत. काही जण ‘कम ऑन किल मी’.. म्हणत आहेत मात्र त्यांची अवस्था आज ‘शोले’ सिनेमातील असरानीसारखी झाली आहे. त्यामुळे जेव्हा ते प्रत्यक्ष मैदानात लढायला उतरतील तेव्हा मागे कुणी राहील की नाही ते सांगता येत नाही. प्रत्येक दिवशी होणारी गळती थांबवायची कशी असा प्रश्न उबाठा यांना पडला आहे. त्यामुळे अगतिक होऊन ज्यांची संपलेला पक्ष अशी अवहेलना गेली त्यांनाच सोबत घेऊन आज युती करण्यासाठी विनवण्या कराव्या लागत असल्याचे सांगितले.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे, किशोरअप्पा करंजकर, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबाडे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शेकडो कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *