ऑनलाइन राज्यस्तरीय गणित कार्यशाळेत ११ हजार शिक्षकांनी घेतला सहभाग

| जळगाव | जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट, ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लब राजकोट गुजरात व राज्यातील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन वेबीनार दोन दिवसीय राज्यस्तरीय गणित कार्यशाळा – खेळ मनोरंजनातून सहज गणित २०२० नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी ११ हजार शिक्षकांनी ऑनलाइन सहभाग घेतला तर दुसऱ्या दिवशी साडेसात हजार शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यशाळेचे आयोजन भुसावळ येथून ऑनलाईन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेला २६७ वेळा शिक्षकांनी शेअर केले व सहा हजारांपेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या. संपूर्ण राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेला राज्यस्तरीय गणित कार्यशाळा ऑनलाइन वेबिनार एकमेव असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली. कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन डॉ. कपिल त्रिपाठी, विज्ञान प्रसार भारत सरकार, नवी दिल्ली, डॉ. टी.पी. शर्मा (एनसीआरटी,नवी दिल्ली) यांनी केले. तर दुसऱ्या दिवसाच्या वेबिनारचे उद्घाटन तज्ञ मार्गदर्शक मीना सुरेश, नॅशनल डायरेक्टर रामानुजन म्युझियम अँड मॅथ एज्युकेशन सेंटर चेन्नई यांनी केले.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लब राजकोटचे चेअरमन डॉ. चंद्रमोळी जोशी, नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट गुजरातचे डायरेक्टर डॉ. मनोज जवानी यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर संजीव कुमार (डायरेक्टर नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट हिमाचल प्रदेश), एस.वी बुर्ली (डायरेक्टर नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट कर्नाटक) यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षकांसाठी सुद्धा वेबिनार असावा, मनोरंजनातून सहज व सोपे गणित विद्यार्थ्यांना कसे शिकवावे याचे ज्ञान व प्रशिक्षण देण्याच्या उदात्त हेतूने ही संकल्पना जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्यामार्फत तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक यांच्या टीम कडे आली. कार्यशाळा समन्वयक म्हणून योगेश इंगळे, जीवन महाजन, गोविंदा ठाकरे, अजित चौधरी, ठाण्याचे प्राजक्त झावरे पाटील यांनी काम पाहिले. तर जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या सर्व सदस्यांनी यात परिश्रम घेत योगदान दिले.

या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत गणितज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ राज्यभरातील शिक्षकांनी घेतला. आत्मनिर्भर भारत या अभियाना नुसार स्वतः आत्मनिर्भर बनून देशाची, राज्याची व आपल्या शाळेची आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी पुढील काळातही राज्यातील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक यांच्या टीमकडून विविध विषयांवर वेबिनार आयोजित होतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

” अतिशय उत्तम सेमिनार झाले, उलट वेळ कमी पडला. या लॉक डाऊनच्या काळात, मी स्वतः बरेच वेबिनार मध्ये सहभागी झाले होते. परंतु दर्जा , नियोजन आणि प्रमाणपत्र नियोजन हे सर्वच उत्कृष्ट असेच होते. समन्वयकांचे आभार..! ”
– श्रीमती राजश्री गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *