| मुंबई | ३ मे रोजी लॉकडाऊन लागू करून ४० दिवस पूर्ण होणार आहेत. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणाची यादी देखील केंद्र सरकारकडून आता जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने महराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये, १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर ६ जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन झोन क्षेत्रात लॉकडाऊन संदर्भातील नियमावली येत्या ३ मे रोजी घोषित केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बाबत माहिती देताना केंद्रीय गृहसचिव प्रीती सुदान म्हणाल्या, सर्व राज्यांना कळविलेल्या रेड व ऑरेंज झोन जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन आणि बफर झोनमध्ये मर्यादा घालण्याची आणि कळविण्याची विनंती केली आहे. गेल्या 21 दिवसांत कोरोनाचे कोणतेही नवीन प्रकरण नसल्यास जिल्हा जिल्हा ग्रीन झोन मानला जाईल. 3 मेनंतर 130 जिल्हे रेड झोनमध्ये, 284 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर 319 जिल्ह्यांचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाने अजूनही दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबादला रेड झोनमध्ये ठेवले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील 14, दिल्लीचे 11, तामिळनाडूचे 12, उत्तर प्रदेशचे 19, बंगालचे 10, गुजरातचे नऊ, मध्य प्रदेशचे नऊ, राजस्थानमधील आठ जिल्हे रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत.
सुदान पुढे म्हणाल्या, एक किंवा अनेक महानगरपालिका असलेल्या जिल्ह्यातील इतर महानगरपालिका आणि इतर विभाग स्वतंत्र युनिट म्हणून मानले जाऊ शकतात. जर ते रेड किंवा ऑरेंज झोनमध्ये आले आणि गेल्या २१ दिवसांत यापैकी एका किंवा त्यापेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधित आढळले नाही, तर विभागीय वर्गीकरणात ते पातळी खालचे मानले जाऊ शकते.
पाहा तुमचा जिल्हा, कोणत्या झोनमध्ये-
रेड झोन- मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव
ऑरेंज झोन- रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड
ग्रीन झोन- उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया, गडचिरोली