| मुंबई | देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच महाराष्ट्र आणि गुजरात येथे सर्वाधित कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रात एकूण १३६२ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यातील एकूण संख्या १८१२० पर्यंत पोहोचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.
1,362 #COVID19 cases reported in Maharashtra today, the total number of cases in the state is now at 18,120: State Health Minister Rajesh Tope (file pic) pic.twitter.com/xxzplC27Oe
— ANI (@ANI) May 7, 2020
धारावीत चिंता वाढली
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. धारावीत आज नव्या ५० रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण रुग्णसंख्या ७८३ पर्यंत पोहोचली आहे. केवळ धारावीतच आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे माहीम या भागात २ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून येथील एकूण रुग्णसंख्या ६६ पर्यंत पोहोचली आहे. आज दादर या भागात ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून येथील आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या ९६ पर्यंत पोहचली आहे.
तुरुंगात पोहचला कोरोना
याशिवाय मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी आणि ७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ७२ कैद्यांना जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. अत्यंत सुरक्षितपणे वाहनांमधून उद्या सकाळी त्यांना रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या तुरुंग प्रशासनाने दिली आहे.