विज्ञान युगातही अंधश्रद्धा कशी जिवंत आहे याची प्रचिती सूर्यग्रहणावेळी येत असते. ग्रहण काळात अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत तर एका नगरपरिषदेने चक्क पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्याअनुषंगाने…
ग्रह-तारे अवकाशात भ्रमण करत असताना त्यांची एकमेकांवर सावली पडल्यावर ग्रहण लागते. त्या ग्रहणाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून दैनंदिन जीवनात अनेक बदल करणे, जे बदल खरे त्रासदायक असतात, ते करणे योग्य आहे का, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून ग्रहणाला सामोरे जाणे योग्य?
सुरुवातीला ग्रहण म्हणजे काय हे समजून घेऊ या. सूर्य या ताऱ्याभोवती पृथ्वी आणि चंद्रही फिरत असतो. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो आणि त्याची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते तेवढ्या कला चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्यासारखा वाटते. ते सूर्यबिंब पूर्ण झाकल्यासारखे असेल तर त्याला ‘खग्रास सूर्यग्रहण’ म्हणतात आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले असेल तर त्याला ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ म्हणतात. सूर्य चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आल्यास ‘चंद्रग्रहण’ लागते. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ‘खग्रास चंद्रग्रहण’ आणि काही भागावर पृथ्वीची छाया पडल्यास ‘खंडग्रास चंद्रग्रहण’ होते.
ग्रहण ही सौरमंडळातील एक घटना आहे जसे सूर्योदय आणि सूर्यास्त होतो तसे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण असते. असे असले तरी या ग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा, गैरसमज समाजात पसरले आहेत. त्यातील काही सर्वपरिचित गैरसमज प्रातिनिधिक स्वरूपात पाहू या. ग्रहण सुरू होण्याच्या आधीच खाद्यपदार्थ आणि घरामध्ये सगळीकडे तुळशीची पाने टाकली जातात, ग्रहणकाळात केस, नखे कापणे, शिलाई करणे, चाकू, कात्री आदींचा वापर करणे, स्वयंपाक करणे, कुठल्याही देवदेवतांची पूजाअर्चा करणे अशुभ मानले जाते. इतकेच काय देवांना स्पर्श करणेही पाप मानले जाते. देवी-देवतांना कपाटात बंद करून ठेवले जाते आणि पूजेचे कुठलेही वाक्य उच्चारायचे नाही असा नियमच काही घरात आजही पाळला जातो. ग्रहणाच्या दिवशी घरातील गर्भवती स्त्री, वृद्ध, बालके, रुग्ण, अशक्त व्यक्ती यांना पाणी पिण्यास, खाद्यपदार्थ खाण्यास बंदी असते. इतकेच काय औषधही दिले जात नाही. भाजी किंवा फळ चिरल्यास ओठ चिरतात, मलमूत्रोत्सर्ग बंदी असते, झोपायला बंदी असते. अशा अनेक गैरसमजुती समाजामध्ये आजही आहेत.
ग्रहण काळात गर्भवती महिला, वृद्ध, बालके, रुग्ण, अशक्त व्यक्ती यांनी त्यांना खूप भूक लागली असताना खाल्ले नाही तर त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होईल आणि त्यांना चक्कर आल्यासारखे होईल आणि ग्रहण संपल्यावर अचानक खाल्ल्यावर त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाणही अचानक वाढेल त्याचाही त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. वेळेवर पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशन होते. मलमूत्रोत्सर्ग बंदी घातली जाते त्यामुळे किडनीवर थेट वाईट परिणाम होऊ शकतो. ग्रहण काळात बुटक्या माणसाला ओढल्यास तो लांब होतो, असे असते तर जगात कुणीच बुटके राहिले नसते आणि सगळेच उंच झाले असते. जपान, चीन आणि पूर्वेकडील अनेक सधन देशातील लोक उंचच उंच दिसले असते. एखादी क्रीम लावल्याने 8 दिवसांत गोरे होणार, जर एखाद्या क्रिमने कुणी 8 दिवसांत गोरा झाला असता तर आफ्रिका खंडातील सगळेच लोक गोरी झाली असती. हे जितके खोटे आहे तितकेच ग्रहणाबाबतच्या गैरसमजुती. बरं या गैरसमजांना कुठलंही वैज्ञानिक अधिष्ठान नाहीये.
अमुक अमुक फोटो १०० लोकांना फॉरवर्ड करा, तुम्हाला एका तासात आनंदाची बातमी समजेल. ही अंधश्रद्धा जशी आपण सगळ्यांनी हद्दपार केली तसेच ज्या अंधश्रद्धा आहेत त्याकडे आपण सगळ्यांनी डोळसपणे बघायला पाहिजे. ग्रहण ही ग्रहांची दिनचर्या आहे. त्यांच्या दिनचर्येतील सावलीसाठी आपण आपली दिनचर्या न बदलता ज्या अंधश्रद्धा समाजात रूढ झाल्या आहेत त्या बदलायला पाहिजेत. आवश्यक साधनांनी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण पाहून त्याचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे.
समाजामध्ये अनेक रूढी-परंपरा आपण आपल्या परीने जपत असतो. माणसाने नेहमीच श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धा नको. फक्त हजारो वर्षांपासून सर्वांनी हे केलं म्हणून मीही तसे करायचं यापेक्षा मला हे योग्य वाटते म्हणून मी ते करते/करतो अशी भूमिका आता प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तसा प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे. फक्त ग्रहणच नाही तर समाजात ज्या अनिष्ट रूढी-प्रथा-परंपरा आहेत त्यांच्याकडे डोळसपणे पाहायला हवंय आणि त्यातीलही ज्या रूढी-प्रथा-परंपरा समाज्यामध्ये अप्रत्यक्षपणे अंधश्रद्धा पसरवत असतील त्या आपण स्वतःहून आधी आपल्या घरापासून बंद करायला पाहिजेत. गेल्या काही वर्षांत अनेक अनिष्ट रूढी-प्रथा-परंपरा कालबाह्य झाल्या आहेत. ग्रहणाबाबत ज्या अंधश्रद्धा आहेत त्याही लवकरच कालबाह्य होतील फक्त गरज आहे ह्या रूढी-प्रथा-परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होता कामा नये इतकंच…