ठाणे : ठाणे शहर, कळवा – मुंब्रा, उल्हासनगर, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ मधील ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस आणि पत्रकारांची आजपासून मोफत आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन , वनरुपी क्लिनिक आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज या उपक्रमाला सुरुवात झाली. यात खासदार श्रीकांत शिंदे आज डॉक्टरच्या भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडताना दिसले. थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून डॉ शिंदे यांनी ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांची तपासणी केली तर, कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या पोलिसांची कोविड तपासणी करण्यासाठी लॅबोरेटरीजच्या कर्मचारी यांस तात्काळ बोलावून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
ठाणे शहरातील नितीन कंपनी सिग्नल येथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांची तपासणी करून आज या उपक्रमाला सुरुवात झाली. आज सकाळपासून या फिरता दवाखाना अंतर्गत एकाच दिवसात 200 पोलीस आणि पत्रकारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
यात सर्दी – ताप लक्षणे असलेल्या दोन कोरोना संशयित पोलिसांची कोविड टेस्ट देखील करण्यात आली. आज सायंकाळपर्यंत या पोलिसांचे रिपोर्ट उपलब्ध झाल्यानंतर आवश्यकता असल्यास पुढील उपचारासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.