या कारणासाठी एमपीएससी चे विद्यार्थी कोर्टात..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणा-या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी करूनही आयोगाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर, २०२० रोजी होणा-या विविध पदांसाठीच्या भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पुणे हे परीक्षा केंद्र निवडले असेल त्यांना आता त्यांच्या नजीकच्या विभागीय परीक्षा केंद्राची निवड करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना १७ ते १९ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाद्वारे केंद्र बदलासाठी नोंदणी करायची आहे.

परीक्षेसाठी पुण्यासह अनेक विद्यार्थ्यांनी मुंबई, नाशिक व पुण्यानजीकच्या जिल्ह्णांची परीक्षा केंद्रासाठी निवड केली होती. त्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार नसल्याने विरोध होत आहे. याशिवाय विभागीय केंद्र निवडीची मुभा दिल्याने काहीसे अंतर कमी होणार असले तरी विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करावाच लागणार आहे. त्यात सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांसमोर अडचणी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द न करता ती वेळेत घ्यावी.

मात्र, पुणे, मुंबई व अन्य ठिकाणच्या परीक्षा केंद्राची आधी निवड केलेल्या व कोरोनामुळे सध्या स्वगृही परतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा द्यावी, अशा मागणीची याचिका दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *