ई पास रद्द होण्याची शक्यता, सरकारची द्विधा मनस्थिती..!

| मुंबई | कालपासून राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा केली आहे, ही सेवा करताना , एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास अजूनही बंधनकारक आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांच्या तक्रारी येऊ लागल्याने सरकार या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

राज्य सरकारने राज्यभरात एसटीची सेवा सुरू करताना, एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले. साहजिकच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करणाऱ्यांना विना ई-पास प्रवास करणे शक्य झाले आहे. मात्र, एसटीऐवजी खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे झाल्यास मात्र ई-पास अजूनही बंधनकारक आहे. एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज नाही आणि खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची अट कशासाठी, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. साहजिकच तक्रारींचा ओघ वाढत चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांना सहजासहजी ई-पास मिळत नसताना एजंटमार्फत गेल्यास लगेचच ई-पास मिळतो, अशाही तक्रारी समोर येत आहेत.

यासर्व पार्श्वभूमीवर ई-पास पूर्णपणे बंद करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समजते. याबाबत सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी आवश्यक ती चर्चा करण्यास प्रशासनाच्या पातळीवर सुरुवात झाली असून, अंमित निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे कळते. दरम्यान, एकीकडे ई-पास बंद करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असताना, दुसरीकडे ई-पास नसल्यास कोणत्याही बंधनाशिवाय नागरिक सर्वत्र मुक्त संचार करतील आणि त्यामुळे करोनाचा फैलाव वाढेल, अशी भीतीही सरकारला वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *