ठाणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सरकारच्या मार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या लाईव्ह संबोधनात त्यांनीही आरोग्य क्षेत्राशी संबंधित, प्रशिक्षित लोकांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला शिवसेनेच्या कल्याण डोंबिवली महापौर विनिता राणे यांनी प्रतिसाद देत आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी त्याबाबत आयुक्तांकडे रितसर मागणी देखील केली आहे.
विनिता राणे यांनी ३५ वर्ष मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा केली आहे. या क्षेत्राचा मला प्रदीर्घ अनुभव असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.
बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे शिवसेना पक्ष ८०% समाजकारण व २०% राजकारण करणारा पक्ष आहे, त्याचा प्रत्यय या माध्यमातून संबंध देशाला येत असल्याचे चित्र या उदाहरणावरून निर्माण होत आहे. दरम्यान ठाण्यात देखील कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे डॉक्टरच्या कर्तव्यावर रुजू होऊन ड्युटी वरील पोलीस व पत्रकार यांची तपासणी करत होते.