जागर इतिहासाचा : या ठिकाणी होते रावणाची पूजा..!

असत्यावर सत्याचा, वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा करण्यात येतो. याच दिवशी प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. मात्र, देशात काही ठिकाणी रावणाची मंदिरे असून त्या ठिकाणी रावणाच्या पुतळा दहनाची परंपरा पाळण्यात येत नसून रावणाची पूजा करण्यात येते.

१. उत्तर प्रदेशमधील बिसरख गावात रावणाचे मंदिर असून भक्तीभावाने आणि श्रद्धेने रावणाची पूजा करण्यात येते. बिसरख गाव रावणाचे आजोळ असल्याची मान्यता असल्याने याठिकाणी रावणाचे मंदिर असून गावकरी रावणाची पूजा करतात आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येत नाही.

२. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्येही रावणाची पूजा करण्यात येते. मंदसौरचे नाव दशपूर होते. हे गाव रावणाची पत्नी मंदोदरीचे माहेर असल्याने त्याला मंदसौर असे नाव पडले. त्यामुळे हे गाव रावणाचे सासर असल्याची मान्यता आहे. सासूरवाडीत जावयाचा सन्मान करण्यात येतो. त्यामुळे या गावात रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची पंरपरा नसून रावणाची पूजा करण्यात येते.

३. मध्य प्रदेशातील रावणग्राममध्ये रावणाला देव मानून त्याचे पूजन करण्यात येते. या गावात रावणाची महाकाय मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या गावात रावणाला देवतेचे स्थान असल्याने या गावातही रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा नाही. या गावात दसऱ्याला रावणाची विशेष पूजा करण्यात येते.

४. राजस्थानातील जोधपूरमध्ये रावणाचे मंदिर आहे. या ठिकाणी एका समाजाकडून रावणाचे पूजन करण्यात येते. या समाजातील लोक स्वतःला रावणाचे वंशज मानतात. त्यामुळे या समाजात रावणाचे पूजना करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या गावातही रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येत नाही.

५. आंध्र प्रदेशातील काकीनाडमध्येही रावणाचे मंदिर आहे. या ठिकाणी येणारे भाविक रावणाला शक्तीसम्राट मानतात. या गावात भगवान शंकरासोबत रावणाचीही पूजा करण्यात येते. रावणाने आपल्या भक्तीने भगवान शंकराला प्रसन्न केले होते. तसेच तो शिवभक्त असल्याने या ठिकाणी भगवान शंकरासोबत रावणाचेही पूजन करण्याची परंपरा आहे.

६. हिमाचल प्रदेशात कांगडा जिल्ह्यातील काही गावात रावणाची पूजा करण्यात येते. या ठिकाणी रावणाने भगवान शंकराची आराधना केली होती आणि वरदान मिळवले होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या गावात रावणाची पूजा करण्यात येते. रावणाच्या पुतळ्याचे दहन केल्यास मृत्यू होण्याची भीती या गावात असल्याने रावणाच्या पुतळा दहनाची पंरपरा या गावांमध्येही पाळली जात नाही.

७. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील काही आदिवासी समाजात रावण आणि त्याचा पुत्र इंद्रजीत यांना दैवत मानतात. त्यामुळे या आदीवासींकडून त्यांचे पूजन करण्यात येते. विविधतेत एकता असणाऱ्या आपल्या देशाचे हेच वैशिष्ट्य आहे. काही ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येते. तर काही ठिकाणी रावणाची पूजा करण्यात येते. मात्र, तरीही वाईटावर चांगल्याचा विजय या हेतूनेच हा सण देशभरात साजरा करण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *