डोंबिवलीतील सुतिकागृहाच्या जागी होणार मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश..

| डोंबिवली | डोंबिवली येथील बंद अवस्थेतील सुतिकागृहाच्या पुनर्विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून या सुतिकागृहाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यामुळे नागरिकांना अत्यल्प दारात दर्जेदार आरोग्यसुविधा मिळणार आहेत.

डोंबिवली पूर्व येथील सुतिकागृह गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत आहे. येथील इमारतही धोकादायक बनल्यामुळे या रुग्णालयाचा पुनर्विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे आग्रही होते. गेली तीन वर्षे सातत्याने यासंदर्भात पत्रव्यवहार करून व अनेक बैठका घेऊन या पुनर्विकासाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन व विद्यमान आयुक्त, तसेच महापौर यांच्या पातळीवर केलेल्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने पीपीपी तत्त्वावर पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, नवीन रुग्णालयाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन सोमवारी तो सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला. सर्वसाधारण सभेने मंजुरीची मोहोर उमटवल्यामुळे आता पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जुन्या रुग्णालयाच्या जागी दोन नव्या इमारती उभ्या राहणार असून एका इमारतीत अद्यायवत मॅटर्निटी होम, तर दुसऱ्या इमारतीत मल्टी स्पेशालिटी रुग्णालय असणार आहे. मॅटर्निटी होम संपूर्ण तयार स्थितीत महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार असून खासगी रुग्णालयाप्रमाणे सर्व अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा येथे उपलब्ध असतील, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून अलीकडेच शास्त्रीनगर रुग्णालयात एक्स रे, एमआरआय व पॅथॉलॉजी सेवा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सुतिकागृहाच्या पुनर्विकासासाठी साह्य करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, तसेच सर्व नगरसेवकांचेही खा. डॉ. शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *