खामगावच्या मनीषा ठाकरे आणि तिच्या कुटूंबियांचा काही वर्षांपूर्वी जेजुरीजवळ अपघात झाला होता. त्या अपघातात मनीषाने तिच्या आयुष्यातलं सर्वकाही गमावलं होतं. तिचे आई वडील, तिचा भाऊ आणि तिचा चार वर्षाचा एकुलता एक मुलगा देवांशु रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून बेशुद्ध पडलेली मनीषा; शुद्धीवर आली तेव्हा तिला जाणवलं की आता सगळं संपलंय… त्या अपघातात सुदैवाने ती वाचली; पण त्या अपघातात तिनं तिचे दोन्ही पाय कमरेपासून गमावले होते. आता दुःख आणि वेदना यातच सगळं आयुष्य जगावं लागणार होतं; त्या दुःखावर फुंकर घालायला आपलं म्हणावं असं कुणी नव्हतं… आधार देणारे आईबाप नव्हते… ज्याच्यामुळे जगण्यात आनंद भरला होता तो काळजाचा तुकडा मृत्यूशय्येवर छिन्न विच्छिन्न पडला होता. हिमतीने स्वतःच्या पायावर उभं राहायला स्वतःचे पायही शिल्लक नव्हते. आयुष्य जगायचं कसं, कशासाठी आणि कुणासाठी या प्रश्नामुळे अख्या आयुष्यात काळोख पसरलेला असताना ठाकरे कुटूंबियांच्या आयुष्यात आनंदाचा उजेड भरला तो “डॉ.विकास आमटे” यांनी..! त्यांना पालकत्वाचा आधार दिला तो “डॉ.प्रकाश आमटे” यांनी..! त्यांच्या कुटूंबाला उभार दिला तो “डॉ.शीतल आमटे” यांनी..! त्यांना कुटूंब म्हणून भक्कम पाठींबा दिला तो आनंदवनातल्या प्रत्येक माणुसकीच्या खांबांनी..! मनिषाच्या पायासाठी लाखो रुपये खर्चून विदेशातुन केलेली उपचार व्यवस्था असो की मग ठाकरे कुटूंबियांना दिलेला मानसिक आधार.. ठाकरे कुटूंबियांच्या नवजीवनाची खरी संजीवनी ठरली होती “आनंदवन आणि आनंदवनातील माणसं..!”
“हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती..” असं म्हणत ठाकरे कुटूंबियासारखी महाराष्ट्रभर असंख्य कुटूंब आहेत ज्यांना आनंदवन आणि आमटे कुटूंबामुळे नवं आयुष्य मिळालं. समाजानं नाकारलेल्या कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, परित्यक्ता, मूकबधिर, निराधार लोकांबरोबरच प्राण्यांच्या संवेदना जाणून मुक्या जीवांनाही माणुसकी शिकवणारे, त्यांना नवं आयुष्य देणारे आमटे कुटूंबीय माणूस म्हणवणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श ठरले. समाजातल्या प्रत्येक पिचलेल्या घटकांच्या अडचणींवर अभ्यास करून त्यांना त्या अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून कार्य करणारी आमटे कुटूंबाची तिसरी पिढीही हा वारसा सक्षमपणे सांभाळण्यासाठी संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातील एका कुटूंबाची तिसरी पिढी पूर्ण समर्पण वृत्तीने समाजातल्या उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी आजही धडपड करत आहे ही नक्कीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि भुषणावह बाब राहिली आहे. जगाच्या नकाशावर सामाजिक पटलावर देशाला भूषण वाटावं असं योगदान देणारं हेच आमटे कुटूंबीय जेव्हा दुःखाच्या फेऱ्यात आणि अडचणीत सापडतं, तेव्हा समाज म्हणून त्यांना या प्रतिकूल परिस्थितीत साथ देण्याची जबाबदारी समाजातल्या प्रत्येकावर येत नाही का..? उलट त्यांना अडचणीत सापडलेलं पाहून त्यावर समीक्षा, चर्चा, आणि आपलं शब्द पांडित्य यांचा खेळ खेळून स्वतःला विद्वान ठरवू पाहणाऱ्यांना आसुरी आनंदापलीकडे काय मिळणार आहे..? तेच जाणो..!
मी गेल्या अनेक वर्षांपासून आनंदवन आणि आमटे कुटूंबियांच्या सानिध्यात आहे. एक बेफिकीर माणूस ते जबाबदार कार्यकर्ता हे माझ्या जगण्यातलं परिवर्तन केवळ आनंदवनाच्या परिसस्पर्शाने शक्य झालं. आनंदवनाने मला जगण्याचा नवा अर्थ शिकवला. मीच नव्हे तर माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते आनंदवनाच्या या मातीतून घडले. श्रध्येय बाबा आमटे, डॉ विकास आमटे, डॉ प्रकाश आमटे यांच्या शिकवणीतून देशभरात माणुसकीची अनेक बेटे तयार झाली. जी जोडो भारतचा नारा देऊन हा देश एकसंध आणि निकोप समाज घडवू पाहताहेत. त्याच आमटे कुटुंबातील एका कर्तबगार मुलीचा गेल्या काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. आणि तिच्या मृत्यूमुळे समाजमनावर विविधांगी परिणाम झाले, हे जरी खरं असलं तरी याचा खरा दूरगामी परिणाम झाला तो आमटे कुटूंबियावर..!
डॉ विकास आमटे… त्या मुलीचा अभागी बाप..! शरीर थकलेल्या अवस्थेत आपल्या एकुलत्या एक मुलीच्या जाण्यानं किती कोसळला असेल हे जाणून घ्यायलाही जिवंत बापाचंच काळीज असावं लागेल. ज्या बापानं मोठया विश्वासाने पुरुष प्रधान संस्कृती डावलून आपल्या मुलीच्या खांद्यावर आनंदवनाची जबाबदारी सोपवली होती तोच बाप आज स्वतःचेच खांदे निखळल्यागत आसावं ढाळतोय. त्यांना या आपल्या लेकराच्या दुराव्यांन आता विसर पडलाय त्यांच्या “विकास आमटे” असण्याचा… नागपूर येथे डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन चंद्रपूरच्या निबिड आणि निर्मनुष्य जंगलात कुष्ठरुग्णासाठी आनंदवनाच्या झोपडीला पक्क्या घराचं रूप देताना आयुष्य कसं मावळतीकडे झुकलं, याचा कदाचित त्यांच्याकडे हिशोब नसेल; पण मुलीच्या अकाली जाण्यानं प्रत्येक क्षण मोजून जगणाऱ्या त्या कर्मयोग्याला आज बाप म्हणून त्यानं काय गमावलय याची मात्र प्रत्येक क्षणाला जाणीव होत असेल… कारण जरी तो बाबा आमटे यांचा मुलगा असला तरी शेवटी तोही माणूसच आहे ना..! लाखो लोकांच्या आयुष्यातलं दुःख वेचणाऱ्या या कर्मयोग्याचं दुःख पुसण्याचं बळ मात्र कुणातच नसावं हेही तितकंच जीवघेण वास्तव. माणसं जेवढी मोठी असतात त्यांची दुःखेही तेवढीच भयानक असतात. स्वतः दुःखाचे, संघर्षाचे, आणि संकटांचे विष पचवून इतरांच्या आयुष्यात आनंद भरणाऱ्यांच्या दुःखात वाटेकरी होणं सोपं नसतं. त्यांना हे दुःख पचवण्याची ताकत मिळो एवढीच प्रार्थना..!
डॉ शीतल आमटे यांनी आत्महत्या केली त्या दिवशीपासून माध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. वेगवेगळ्या अभिव्यक्ती अविष्कारांनी लेख प्रपंच मांडले. कोण चूक ? कोण बरोबर ? असा देखील उहापोह केला. अनेक प्रश्नचिन्हाची मालिका तयार करण्याची अनेकांनी स्पर्धा सुरू केली काय ? असाही एका क्षणासाठी भास होत होता. का झालं..? कसं झालं..? आणि कुणामुळे झालं..? यावर काहींनी मत मतांतरे बनवली. प्रश्न उपस्थित करणे. हा जरी आपला अधिकार असला तरी त्या प्रश्नातून कुणाच्या आयुष्यावर, कुणाच्या भविष्यावर, कुणाच्या निष्काम-निस्वार्थवृत्तीवर, पर्यायाने समाजाला दिशा देणाऱ्या एका प्रभावी चळवळीवर आणि समाजमनावर काही परिणाम होत असेल, तर आपण आपल्या अभिव्यक्तीचंही एकवेळ मूल्यमापन करायलाच हवं..! कारण व्यक्त होणं आणि ते अनुभवणं यात खूप फरक असतो. कदाचित गेल्या काही महिन्यांपूर्वी याच माध्यमातून डॉ. शीतल यांच्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यानी एकवेळ सामंजस्याची भूमिका घेतली असती; तर कदाचित एका कर्तबगार मुलीला गमावण्याची वेळ आली नसती. “लोक काय म्हणत असतील..?” या विचार चक्रात मानसिक स्वास्थ्य ढासळण्याच्या अवस्थेतून कदाचित तिला जावं लागलं नसतं. त्यातून अशा चुकीच्या निर्णयापर्यंत कदाचित ती आलीही नसती. पण बाहेरच्या हल्ल्याबरोबरच संभ्रम, महत्वाकांक्षा, अतिविचार, आणि संयमाचा अभाव या आंतरिक संघर्षात डॉ शीतल यांचा बळी गेला.
निश्चितपणे त्यांच्याकडूनही काही गोष्टी चुकल्या असतील. त्यांच्या कुटूंबात कौटुंबिक कलहही कदाचित झाला असेल व होत असेल. जागतिक दर्जाचं काम उभारताना मत मतांतरेही झाली असतील. जंगलवाटेतून आधुनिकतेचा विकास साधणारी, कुष्ठरोगी आणि आदिवासी यांच्या जगण्यात प्रकाश पेटवणारी बाबा आमटे यांची एक पिढी..! आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर ग्राम ते ग्लोबल झेप घेऊ पाहणारी आमटे कुटूंबाची पुढची पिढी यात मत भिन्नता असणं ही सहज बाब होती. पण या सहज वाटणाऱ्या आंतरिक गोष्टीला चव्हाट्यावर आणल्यानंतर मात्र त्यावर झालेली चर्चा आणि टीका सहन करताना डॉ शीतल यांचा न टिकलेला संयम ह्या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरला असावा अस मला वाटतं. कारण डॉ शीतल जेवढ्या चाणाक्ष, गुणी, कल्पक आणि नवनिर्मितीचा ध्यास ठेवणाऱ्या होत्या तेवढ्याच संवेदनशील मनाच्याही होत्या. उत्साह, हर्ष आणि अश्रू या तिन्ही भावनांना त्या सहज मोकळ्या करायच्या. त्यांचं एवढं भावनिक असणं हेच त्यांना घातक ठरलं असावं. आनंदवनात झालेल्या सामाजिक संस्थांच्या मार्गदर्शन शिबिरात भावनिक पातळीवर किती काम करावं याबद्दल डॉ शीतल यांनी माझी सखोल कानउघडणी केली होती. त्यांचे काही शब्द आजही माझ्या कानावर सातत्याने घुमत आहेत. त्या म्हणाल्या होत्या, *”दादासाहेब सामाजिक कार्य करताना अतिभावनिक होऊन काम करायचं नसतं. आपल्या देशात एवढ्या समस्या आहेत की त्या प्रत्येक समस्येवर भावनिक होऊन विचार केला तर तुम्ही वेडावून जाल. एखादा विशिष्ट विषय घेऊन काम करणं सोपं.. आणि समाजात वर्तन बदल आणि मत परिवर्तन करण्याच काम करणं हे मात्र महाकठीण. म्हणून वर्तन बदलाच्या भानगडीत पडाल तर; समाजातील विकृती एक तर तुम्हाला संपवतील किंवा तुम्ही स्वतःला अडचणीत आणाल. त्यामुळे दादासाहेब तुम्ही भावनेवर नियंत्रण ठेवून काम करा. भावनिक होऊन नव्हे तर सजग होऊन काम करा..!” असा आपुलकीचा सल्ला देणारी तीच आमची शीतलताई, भावनेला बळी जाऊ नकोस असं सांगणारी मार्गदर्शिका शेवटी स्वतःच भावनांच्या गुंत्यातुन स्वतःला वाचवू शकली नाही याचा खूप मोठा आघात आमच्यासारख्या अनेकांवर झाला आहे. तिने आनंदवनात हजारो झाडे लावली. आनंदवन घनवन प्रकल्प राबवून मियावकी जंगलाची उभारणी केली. तिला आनंदवन स्मार्ट ग्राम बनवायच होतं. आनंदवनातील प्रयोग तिला जगभरात घेऊन जायचे होते. तिला जलसंधारणाचे वेगवेगळे प्रयोग करायचे होते. तिला बदल घडवायचा होता…पण तो तिच्या मार्गाने..! त्या बदलाआधीच ती असा अर्ध्या संघर्षात सोडून गेली. मनाला पटत नाही. आज तिच्या मुलाचा वाढदिवस आहे.
बिचारा आपल्या लाडक्या ममाला डोळेभरून शोधत असेल. प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी वेगळं देणाऱ्या त्याच्या आईची कमतरता आयुष्यभर तिच्या मुलाला भासत राहील. वाढदिवसाला घर सजवणाऱ्या आपल्या आईच्या दफन केलेल्या ठिकाणी जाऊन ह्या लेकरांनं कदाचित सकाळीच फुलं चढवले असतील. त्या फुलांबरोबर डोळ्यातून पडणारे अश्रू फुलांनी आज तिच्या लेकरांनं वाढदिवस साजरा केला असेल. माणसं अविचाराने सोडून जातात तेव्हा अनेकांना पोरकं करून जातात. शितलताईंच्या मृत्यूमुळे तिच्या मुलाबरोबर अनेक जण पोरके झाले. आनंदवनाची प्रेरणा पोरकी झाली..!
व्यक्ती संपल्या तरी त्यांची स्वप्नं संपायला नकोत. जगाचं काही तरी भलं व्हावं हे स्वप्न बाळगणाऱ्या आमटे कुटूंबाची एक मुलगी सगळ्यांना सोडून गेली. जगाला जगणं शिकवणाऱ्या या कुटूंबात घडलेली ही घटना नक्कीच अनपेक्षित आहे. आजवर ह्या कुटूंबानं जगातले अनेक दुखीतांचे अश्रू पुसले आहेत. आज आपली वेळ आहे; आनंदवनाचे अश्रू पुसण्याची. घडलेल्या घटनेच्या खपल्या काढून तिला चगळण्यापेक्षा आज त्यावर फुंकर मारण्यासाठी आपला प्रयत्न असावा. ज्या कुटूंबाने या जगाला चांगुलपणावर विश्वास ठेवायला शिकवलं त्या कुटूंबाला व त्यांनी उभारलेल्या चळवळीला संजीवनी देण्यासाठी आपण त्यांच्या दुःखाला आधार द्यायला हवा.
“शृंखला पायी असू दे मी गतिचे गीत गाई
दुःख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही..!” असा मंत्र देणाऱ्या बाबा आमटे यांच्या कुष्ठसेवेला, डॉ. विकास आमटे यांच्या आनंदवनातुन राबवलेल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेला, डॉ. प्रकाश आमटे यांच्या आदिवासी उद्धारासाठी केलेल्या कार्यकर्तृत्वातुन उर्जित होऊन जगभरात माणुसकीची बेटे याही पुढच्या काळात निर्माण होतील यासाठी आमटे कुटूंबीय, आनंदवन व त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येक विचारांना बळ देण्याचा प्रयत्न व्हावा एवढीच अपेक्षा.
आनंदवनातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रच नव्हे तर जगभरात सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण झालेली आहे. जी आजघडीला मानवतेच्या शिकवणीतून प्रत्येक उपेक्षित माणसाला नवजीवन द्यायला, देश जोडायला आणि त्यातून राष्ट्र निर्माण करायला धडपड करत आहे. बाबा आमटे आणि आनंदवनाचेच ते शिलेदार आहेत; जे आज समाजात जाऊन सर्व भेद मिटवून समाजनिर्मिती करू पाहतायत. माणुसकीच्या कार्यातून आजही प्रत्येक माणसाला माणसाचं जगणं वाट्याला यावं यासाठी आयुष्य वेचतायेत.जे केवळ तत्त्वज्ञानाच्या शब्दांवर देश उभा करण्याची भाषा बोलत नाहीत तर आपल्या कृतीतून मानवतेच्या संवेदना जिवंत ठेवु पाहतायेत. आज शीतल ताईंचा असा अकाली मृत्यू होणं हा आनंदवनाच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येक मनावर झालेला मोठा परिणाम आहे. माणुसकीच्या विचारावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभे राहिलेले माणुसकीचे हे खांब खंबीर उभे राहायला हवेत. खऱ्या अर्थाने अशाच माणुसकीच्या खांबावर आपला समाज आज उभा आहे. त्या माणुसकीच्या खांबांना निखळून टाकण्यासाठी सरावणाऱ्या हाताना रोखणं ही समाजाची जबाबदारी आहे. एक लक्षात ठेवा माणुसकीची ही खांब निखळून पडली तर समाज म्हणून खूप मोठी हानी होईल… दुर्दैवानं तोच माणुसकीचा शेवट असेल…!
आनंदवनाच्या सुर्यातून अनेक चळवळी उदयाला आल्या. ज्या समाजात बदलाचा प्रकाश पेरत आहेत. आज या सूर्याला काहीसं ग्रहण जरी लागलं असलं… तरी लक्षात असू द्या सूर्य कधी थांबत नाही..!
– दादासाहेब थेटे, समाजभान
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .