- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : शनिवार, १८ एप्रिल
पुणे : कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पुणे शहर हे कोरोनाचं केंद्र बनलं होतं. नंतर काळात कोरोनाबाधितांची संख्या कामी होत गेली. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. मागील २४ तासांत पुण्यात कोरोनाचे ७४ नवे रुग्ण आढळले आहेत.
पुण्यात काल दिवसभरात ५९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. तर पुन्हा रात्रीत आणखी १५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे मागील २४ तासांतील कोरोनाबाधितांचा आकडा ७४ वर पोहोचला आहे. मागील चार दिवसांचा विचार केला असता पुणे जिल्ह्यात १४ एप्रिलला ४९ रुग्ण सापडले. त्यानंतर १५ एप्रिलला ६३, १६ एप्रिल रोजी ६० आणि १७ एप्रिल रोजी ७४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधितांचा आकड्यात सातत्याने वाढच होत असल्याचं दिसत आहे. एकीकडे शासन आणि प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना पुण्यात वाढत असलेला कोरोनाग्रस्तांचा आकडा चिंतेची बाब ठरत आहे.
पुण्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज आढावा घेणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी दोन वाजता यासंबंधित बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुण्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नेमकी काय पाऊलं उचलली जातात, हे पाहावं लागेल.