कोरोनामुळे मानसिक स्वास्थ बिघडले..?
अस्वस्थता, चिडचिड, चिंतेचे प्रमाण वाढले.. पुढे काय.? ही सर्वाधिक लोकांनी व्यक केली चिंता..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २२ एप्रिल. 

| मुंबई | करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे राज्यातील जवळपास २५ हजार जणांनी पालिका ‘एम पॉवर वन ऑन वन’या हेल्पलाइनवर फोन करून आपली अस्वस्थता व्यक्त केली आहे. अवघ्या १८ दिवसांमध्ये हे कॉल आले आहेत. सर्वसामान्यांना या परिस्थितीमध्ये धीर मिळावा, त्यांचे समुपदेशन करता यावे, तसेच गरज लागली तर इतर वैद्यकीय मदतही उपलब्ध व्हावी यादृष्टीने हेल्पलाइनद्वारे प्रयत्न केला जातो.

हेल्पलाइनचे वैद्यकीय सेवाप्रमुख मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अंबरीश धर्माधिकारी यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती दिली आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांनी या हेल्पलाइनवर कॉल करा, असे आवाहन केल्यानंतर येथे येणाऱ्या कॉलच्या प्रमाणामध्ये वाढ झाली. त्यातील बहुतांश दूरध्वनी हे करोनाच्या साथीमध्ये उद्भवलेल्या मानसिक तणावामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थेचा सामना कसा करावा, याची विचारणा करणारे आहेत. अस्वस्थता, चिडचिड, चिंतेचे प्रमाण वाढले आहे. विलगीकरणाच्या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या समस्यांमुळेही अस्वस्थता येते, असेही फोन करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले आहे.

करोना कधी संपणार आणि तो संपल्यावर पुढे काय होईल, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे भविष्याची चिंतेमुळे अनेक जण मानसिक स्वास्थ्य गमावून बसले आहेत. नोकरी, आरोग्य, मुलांची कुटुंबांची काळजी यामुळे चिंताग्रस्त झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. काही जणांना यामुळे तीव्र प्रकारच्या नैराश्याचा सामना करावा लागतो. वसतिगृहांमध्ये राहणारे तसेच एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एकाकी वाटत असल्याचेही फोन येतात. जोडीदारासोबत वाद होतात, तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या मतभेदांचे प्रमाण वाढले आहे. घरातील कामामधील सहभाग आणि जबाबदारी न घेण्याच्या मुद्द्यांवरून, तसेच वैयक्तिक मोकळीक देण्याच्या मुद्द्यांवरून होणारे वाद वाढीस लागल्याचे दिसते. फोन करणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा १० टक्के अधिक आहे, तसेच तरुण मुले ही वयोवृद्ध पालकांबद्दल अधिक चिंतेत असल्याचेही कॉल येतात.

या हेल्पलाइनवर मानसोपचारतज्ज्ञ आणि प्रशिक्षित समुपदेशकांची मदत उपलब्ध केली जाते. कोणत्याही वेळी फोन केला तरीही मानसिक आरोग्यासाठी खात्रीदायक मार्गदर्शन मिळेल हा विश्वास दिला जातो, असे येथील समुपदेशक सांगतात. फोन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असल्यामुळे संवेदनशीलपणे प्रत्येक कॉल घेऊन शांतपणे समस्या ऐकत मार्गदर्शन केले जाते. एखाद्या व्यक्तीला भविष्यकाळामध्ये मानसिक अनारोग्याचे प्रश्न उद्भवणार असतील, तर त्यादृष्टीनेही मार्गदर्शन केले जाते. प्रत्यक्ष मदतीची गरज असेल तर जवळच्या सरकारी रुग्णालयातील मानसिक आरोग्यतज्ज्ञांचाही संदर्भही देण्यात येतो. एकंदरीत, मुख्यमंत्री यांच्या आवाहनानंतर वाढलेले फोन आणि त्यांच्या समस्या पाहता, हे नवीन मानसिक संकट परतवणे देखील तितकेच महत्वाचे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *