कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही
रेमडेसिवीर पुरवावेत : महापौर नरेश म्हस्के.

| ठाणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआरची तपासणी करतात, मात्र सदर तपासणी अहवाल येण्यास दोन तीन दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुगणालयात दाखल होतात. काही वेळेस या रुग्णांना देखील रेमडेसिवीरचे इंजेक्शन देणे आवश्यक असते, परंतु खाजगी रुग्णालयात सदर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यास विलंब होतो, यासाठी ठाण्यातील नॉन कोविड रुग्णालयात देखील रेमडेसिवीरचा पुरवठा करावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

ठाण्यामध्ये महापालिकेच्या कोविड रुग्णालयाव्यतिरिक्त एकूण 40 खाजगी रुग्णालयांना कोविड रूग्णालयाची मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिध्द् झालेल्या यादीमध्ये केवळ 16 रुग्णालयांचीच नावे समाविष्ट आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने मान्यता दिलेल्या सर्व कोविड रुग्णालयाची नावे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या यादीत समाविष्ट करावीत तसेच कालानुरूप जसजशी खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून महापालिकेच्या वतीने मान्यता देण्यात येईल त्या रुग्णालयाची नावे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यादीत समाविष्ट करावी असेही महापौर यांनी नमूद केले आहे.

संशयित व्यक्तीने तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम अँटीजेन टेस्ट केली जाते. त्याचा रिपोर्ट अवघ्या काही मिनिटात मिळतो परंतु ही टेस्ट निगेटिव्ह आली आणि लक्षणे असली तर आरटीपीसीआर चाचणी केली जाते. मात्र या चाचण्या करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असून चाचणी अहवाल येण्यास तीन ते चार दिवसाचा अवधी लागत असतो. या रुग्णाकडे कोव्हिड पॉझिटिव्हचा रिपोर्ट नसल्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयामध्ये दाखल करुन घेतले जात नाही. परंतु कोरोनाचीच लक्षणे असल्यामुळे डॉक्टर त्यांना बहुतांश वेळा एचआरसीटी तपासणी करण्यास सांगतात व यामध्ये फुप्फुसामध्ये इन्फेक्शन असेल अशा रुग्णांना देखील रेमडेसिवीर इंजेक्शनची नितांत आवश्यकता असते, परंतु खाजगी रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे योग्य उपचार करण्यास विलंब होतो व यामध्ये रुग्ण नाहक दगावला जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नॉन कोविड रुग्णालयात देखील रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असणे आवश्यक आहे.

महापालिकेने मान्यता दिलेल्या कोविड रुग्णालयामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाते. सद्यस्थितीत नॉन कोविड रुग्णालयात देखील रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता व गरज लक्षात घेवून याबाबत योग्य नियोजन करुन कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयातही रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे असेही महापौर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *