चीनच्या उलट्या बोंबा..!
भारतात चुकीच्या पद्धतीने किटचा वापर करत असल्याचा आरोप..!



| नवी दिल्ली | चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे. यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तूर्तास या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला आहे. मात्र चीनमध्ये या रॅपिड टेस्ट किटची निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या किटमध्ये काही समस्या नसून भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असे सांगत भारतालाच याबाबतीत दोषी ठरवले आहे. याविषयीची माहिती इंडिया टुडे या इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे.

भारतात एकूण पाच लाख टेस्टिंग किट आयात करण्यात आल्या होत्या. चीनमधील दोन कंपन्या Wondfo Biotech आणि Livzon Diagnostics यांच्याकडून हे किट पाठवण्यात आले होते. करोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये या किटचे वाटप करण्यात आलं होतं. राजस्थान आणि पश्चिम बंगाल सरकारने हे किट चुकीचे निकाल दाखवत असल्याची माहिती दिली होती. याची दखल घेत आयसीएमआरने सर्व राज्यांना किटचा वापर थांबवण्याचा आदेश दिला. या किटचा वापर फक्त पाळत ठेवण्यासाठी केला जावा असे सांगण्यात आले आहे.

आयसीएमआरकडून या किटचं टेस्टिंग केलं जात असून जर किट सदोष आढळले तर चीनमधील या कंपन्यांसोबतचा करार रद्द करण्यात येईल अथवा त्यांना नव्याने किट पाठवण्यास सांगण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान किटवरुन वाद निर्माण होऊ लागल्यानंतर चीनमधील संबंधित कंपन्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं असून आपल्या किटमध्ये कोणताही दोष नसून जगभरात ते पाठवले जात असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी किटचा सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे योग्य रितीने वापर करावा असा सल्लाही दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *