राम मंदिराचे काम सुरू असताना सापडल्या प्राचीन वस्तू..!

| अयोध्या | राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद मिटल्यानंतर अखेर राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून अयोध्येतील निश्चित केलेल्या ठिकाणी काम सुरू असून, कामा वेळी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले आहेत. देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब यासह अनेक वस्तुंचं अवशेष इथे सापडले आहेत.

देशात कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सगळी कामं ठप्प होती. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारनं बांधकामांना परवानगी दिली असून, मागील दहा दिवसांपासून आयोध्येत राम मंदिराच्या कामालाही सुरूवात झाली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे.

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितलं की, ”मागील दहा दिवसांपासून मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचं काम सुरू आहे.  यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तुंचं अवशेष सापडलं. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडलं असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे,” अशी माहिती राय यांनी दिली. 

असा होता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय :
एका शतकाहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावा. त्याचबरोबर मशीद उभारण्यासाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा निकाल दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *