या अभिनेत्याला श्रद्धांजली म्हणून बदलले इगतपुरीतील गावाने ‘ नाव ‘ ..!

| नाशिक | आपल्या नैसर्गिक अभिनयानं रसिकांना बसल्या जागी खिळवून ठेवणाऱ्या अभिनेता इरफान खानची एकाली एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली. त्याच्या लाखो चाहत्यांना दु:ख झालंच. आपल्या लाजबाब अभिनयाने त्याने रसिकांवर छाप तर सोडलीच परंतु आपल्या दिलदार वृत्तीने, सामाजिक कार्याने त्यांनी एका गावावर अनोखी छाप सोडली आहे. नाशिकमधल्या इगतपुरीतील एका छोट्या गावातल्या ग्रामस्थांना मात्र त्यांना त्यांचा आधारस्तंभ गेल्याची भावना आहे. इरफान खानच्या स्मरणार्थ त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

हिरवाईनं नटलेला, ऐतिहासिक गड किल्ल्यांची पार्श्वभूमी व पर्यटन क्षेत्राला आकर्षित करणाऱ्या इगतपुरी तालुक्याचं अभिनेता इरफान खानला सतत आकर्षण होतं. इगतपुरी तालुक्यात त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी व बंधाऱ्यालगत अभिनेता इरफान खानचं एक फार्महाऊस आहे. फक्त फार्महाऊस एवढंच इरफानचं या गावासोबतचं कनेक्शन नाहीए. इथले ग्रामस्थ इरफानबद्दल भरभरून बोलतात. ‘देव माणूस होता तो’, असं सांगायला ते विसरत नाही.  इरफानवर असलेल्या प्रेमापोटी गावकऱ्यांनी त्यांच्या स्मरणार्थ गावाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय. या गावाला आता ‘हिरोची वाडी’ असं नाव देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून इरफान आणि इगतपुरी हे कनेक्शन घट्ट झालं होतं. त्रिंगलवाडी परिसरातील पत्र्याचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थी मुलांवर त्यांचं विशेष प्रेम होतं. आपल्या प्रत्येक भेटीत इरफान शाळेतील जवळपास ८०-९० मुलांसमवेत संवाद साधत. त्यांना शालेय साहित्य, स्वेटर, रेनकोट, दफ्तर, मिठाई भेट देत.

दीड वर्षांपूर्वी अमेरिकेत उपचारासाठी दाखल असतानाही इरफान यानं आपल्या नातलगाला आवर्जून त्रिंगलवाडी पत्र्याचा पाडा इथं पाठवून त्या विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य व स्वेटर आदी साहित्य पाठवून मैत्री जपली होती. तसेच त्रिंगलवाडी, पत्र्याचा पाडा गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार अभिनेता इरफान खान यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला होता.  विशेष एखाद्या सिने अभिनेत्याच्या प्रेमापोटी गावाच नाव बदलणार इगतपुरीमधलं हे पहिलचं गाव असावं. या गावकऱ्यांनी इरफान खानला त्यांच्या कृतीतून अनोळखी श्रद्धांजली दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *