विखे पाटील भाजपातले बाटगे तर राणे पावटे, सामनातून घणाघात

| मुंबई | महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय! तसेच महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर सपाटून टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावर विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली होती. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविरुद्ध ही टीका केल्यानंतर सामानातून विखेंना उत्तर दिले आहे.

विसराळू विखेंची बोलती बंद
जगभरातील विनोदी साहित्यात विसराळूपणा हे विनोदाचे अंग बनले आहे. मराठी रंगमंच आणि पडद्यावरही ‘विसराळू’ पात्र खास आणून विनोद निर्माण केला जातो. अशा विसराळू पात्रांत आता नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे-पाटलांची भर पडली आहे. ते विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहेत याचे प्रयोग ते स्वतः अधूनमधून करीत असतात. विखे महाशयांनी दोनेक दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबाबत असे महान भाष्य केले की, ‘‘एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत.’’ यावर शांत बसतील ते थोरात कसले! थोरातांनीही सांगितले की, ‘‘मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे!’’ यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे. विखे अनेक वर्षे काँगेस पक्षात होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत.

विखेंची मूळ पोटदुखी

विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात.

२०१९ च्या निवडणुकीपूर्वी विखे फडणवीसवासी

विखे काँग्रेस पक्षात होते. त्यांचे आजचे वैभव व साम्राज्य ही काँग्रेसचीच दिलदारी आहे. आजचा तालेवारपणा ही काँग्रेसचीच देणगी आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खाटेवर ते व त्यांचे घराणेच आतापर्यंत पाय लांब करून बसले होते, पण एक दिवस विखे सहकुटुंब शिवसेनेत आले. राज्यात व केंद्रात मंत्रिपदे भोगली व नंतर पुन्हा काँग्रेस पक्षात जाऊन सत्ताधारी झाले. काँग्रेसकडून सत्तापद भोगले व २०१९च्या निवडणुकीपूर्वी ते फडणवीसवासी झाले. सध्याच्या कुटील राजकारणात यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नाही. पण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून या विकृतीने तरी कळस गाठू नये.

विखे हे सत्तेशिवाय तडफडणारे मासे

विखे यांनी थोरातांवर हल्ला केला. का, तर बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण हे काही मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांच्याशी तासभर चर्चा केली. ही चर्चा राज्यापुढील संकटासंदर्भात होती. चर्चेनंतर आपले समाधान झाले असल्याचा खुलासा थोरात यांनी केला. म्हणजे, महाविकास आघाडी स्थिर व मजबूत असल्याची ग्वाहीच थोरातांनी दिली. यावर विखे-पाटलांच्या पोटात खळबळ माजण्याचे कारण काय? विखे हे सध्या काँग्रेस पक्षात नाहीत. ते सध्या ज्या पक्षात आहेत त्याबाबत त्यांनी बोलावं; पण सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणार्‍या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. विखे त्याच तडफडणार्‍या माशांचे प्रतिनिधी आहेत.

विखे पाटील भाजपातले बाटगे तर राणे पावटे

एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *