बेस्ट धावायची थांबणार..? कामगार नेते शशांक राव यांची total लॉक डाऊनची घोषणा..!

| मुंबई | कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता अखेर अत्यावश्यक सेवांमध्ये येणाऱ्या मुंबई बेस्ट बसकडूनही शंभर टक्के लॉकडाऊन पाळले जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. परिणामी सोमवारपासून मुंबई बेस्ट बस बंद होणार असल्याचं चित्र निर्माण झाले आहे. 

गेल्या काही काळापासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. याच परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्यांच्या प्रवासासाठी बेस्टकडून जवळपास १३००हून जास्त बस सेवेत रुजू करण्यात आल्या होत्या. पण, बेस्ट कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळं मानसिक तणाव वाढला आहे.

बेस्टमध्ये कार्यरत असणाऱ्या सात कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळं जीव गमावला. तर, ९५ हून अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. ही सर्व परिस्थिती आणि बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या मुद्द्याकडे वारंवार होणारं दुर्लक्ष पाहता अखेर सावधगिरी म्हणून बस सेवा बंद करण्याचं ठरवलं गेल्याचं कळत आहे. ज्याअंतर्गत सोमवारपासून बेस्टही शंभर टक्के लॉकडाऊन पाळला जाणार असल्याचं चित्र आहे.

बेस्ट कर्मचारी नेते, शशांक राव यांनी याविषयीची अधिक माहिती देत या संकटाच्या प्रसंगीसुद्धा प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत बेस्टच्या शंभर टक्के लॉकडाऊनच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं.  ज्यामध्ये कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात अद्यापही देण्यात आला नसल्याचं त्यांनी सांगितले. वैद्यकीय सुविधांचा अभाव असतानाही कर्मचारी स्वत:ची काळजी स्वत: घेत आहेत. पण, परिस्थितीला मिळालेलं गंभीर वळण पाहता, आता बेस्टही पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नसल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *