राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला..!

| नवी दिल्ली | देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसते आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्मितीचं काम तीन किंवा पाच ऑगस्टला सुरू होऊ शकते. आज अयोध्येमध्ये मंदिर निर्माण ट्रस्टची एक महत्वाची बैठक झाली, त्यानंतर या दोन तारखांचा प्रस्ताव भूमिपूजनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला गेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं, अशी इच्छा राम जन्मभूमी न्यासनेही व्यक्त केली होती.

फेब्रुवारी महिन्यातच खरंतर या ट्रस्टची बैठक होऊन रामनवमीपर्यंत काम सुरू होणार होतं. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ते लांबणीवर पडलं. त्याखेरीज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आता मंदिर निर्मितीच्या कामाला सुरुवात होईल. कोर्टाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या राम मंदिर निर्माण ट्रस्टमध्ये एकूण पंधरा सदस्य आहेत. त्यापैकी १२ सदस्यांनी आज अयोध्येतल्या या बैठकीला प्रत्यक्ष हजेरी लावली तर तीन सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. पंतप्रधानांचे माजी मुख्य सचिव रुपेंद्र मिश्रा यांचादेखील या समितीत समावेश आहे. मंदिराच्या एकूण बांधकामाबद्दलची चर्चा सुद्धा या बैठकीत झाल्याचे कळते आहे. त्यानुसार तीन ऐवजी पाच घुमट असावेत आणि मंदिराची उंची १६१ फूट असावी अशा पद्धतीचीही चर्चा या बैठकीत झाली आहे.

असं असेल नवं राम मंदिर
मंदिर एकूण दोन मजल्यांचं असेल. मंदिरातील पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीरामाची मूर्ती असेल. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर प्रभू श्रीरामाचा दरबार असेल. मंदिराच्या घुमटावर धर्मध्वजाची उभारणी केली जाणार आहे. एकूण २१२ खांबावर मंदिराची उभारणी केली जाणार आहे. नव्या राम मंदिराची लांबी २७५ फुट, उंची १३५ फुट, रुंदी १२५ फुट इतकी असेल. एकूण ३६ हजार ४५० चौरस फुट इतक्या क्षेत्रफळावर मंदिर उभारलं जाणार आहे.

राम मंदिर निर्मितीचा प्लॅन
येत्या ३ महिन्यांमध्ये ट्रस्ट निर्माण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या राम मंदिर ट्रस्टमध्ये सहापेक्षा अधिक सदस्य असू शकतात. मंदिरासाठी उत्तर प्रदेश सरकारचं ५०० कोटींचं बजेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम मंदिराच्या ८ किलोमीटरच्या परिघात धर्मशाळा, हॉटेल बांधण्यास परवानगी नसेल.

२०२० मध्ये राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल. तर २०२३ पर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. दरम्यान मंदिराचं बहुतांश स्ट्रक्चर हे दगडाचं असेल. त्यासाठी लागणारे दगड तासण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ६० टक्के दगड तासण्याचे काम पूर्ण झालं आहे. दरम्यान मंदिरासोबतच अयोध्येच्या पुनर्विकासाची योजना आखण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.