पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनला भाजपच्या आमदाराचा हरताळ..

भाजपचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्याची उपस्थिती..


बंगळूर: देशात करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं लॉकडाउनची घोषणा केली. त्याचबरोबर हा संकटाचा काळ असून कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन मोदी यांनी केलं होतं. पण, भाजपा आमदारानेच लॉकडाउनला ठेंगा दाखवला आहे. कळस म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष उपस्थिती होती. करोनाचं संकट टळेपर्यंत लग्न सोहळे आयोजित करून नका, असं आवाहन करणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.

देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्यातील जनतेला सर्व लग्न सोहळे पुढे ढकलण्याचं आवाहन केलं होतं. हे संकट टळेपर्यंत विवाह टाळावे, असं त्यांनी म्हटलं होतं. तेच येडियुरप्पा आता चर्चेत आले आहेत. देशात लॉकडाउन असताना कर्नाटकातील भाजपाचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी आपल्या मुलीचं थाटात लग्न लावून दिलं. बेळगावमध्ये रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. ‘द हिंदू’ दैनिकानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. बेळगावमधील उदयबाग औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या शगुन गार्डन लॉन्सवर हा सोहळा पार पडला. या सोहळ्या तब्बल तीन हजार लोक उपस्थित होते, तेथे ड्यूटीवर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनं सांगितलं. इतक्या मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला लोक उपस्थित राहणे हा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा आणि कायद्याचा भंगच होता. पण कळस म्हणजे खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पाचं या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यामुळे खानापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे विवाहस्थळी करोनाविषयी जनजागृती करणारे दोन होर्डिग्ज लावण्यात आल्या होत्या. दरम्यान, लॉकडाउन असताना हा सोहळा कसा करण्यात आला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरही टीका करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती

या विवाह सोहळ्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगदी, श्रीमंत पाटील, आमदार महेश कुमठल्ली यांच्यासह भाजपा, काँग्रेस आणि जेडीयूचे नेते उपस्थित होते. त्यामुळे करोनामुळे उद्भवणाऱ्या संकटाची गांभीर्य राजकीय नेत्यांना नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *