ब्लॉग : वसतीगृह आणि शिक्षण

तीस चाळीस वर्षापुर्वी किंवा त्याही पलीकडील काळात घर किंवा गुरुकुल असे, जेथे मुलांना सुसंस्कार, गुणवत्तापुर्ण शिक्षण, स्वालंबन आणि शिस्त हे विद्यार्थामध्ये आपोआपच रूजवले जात होते. दिवसभर शाळा शिकणारी मुले सायंकाळी एकत्र यायची आपआपल्या मित्रांशी गप्पा मारायचे, अभ्यास करायची आणि सहकार्याचे जीवन व्यतित करायचे. वसतीगृह ही संकल्पनाच अतिशय प्रामाणिक भावनेतून शिक्षणाचा मार्ग सर्व घटकापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशानेच अस्तित्वात आली होती. छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, वसंतरावजी नाईक यांनी तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक वसतीगृहे निर्माण केली. या शाळेत (वसतीगृहात) राहणारी , शिकणारी लाखो मुले आज उच्च पदावर कार्यरत होवू लागली, किंबहूना आजही त्या संस्काराची पाळंमूळे इतकी खोलवर रूजलेली आहेत, की त्याचे रयत शिक्षण संस्थेसारख्या असंख्य शिक्षण संस्थांच्या रूपाने तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचू लागलंय. पुर्वी मुलांच्या सर्व खाण्याच्या, आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या बारीकसारीक गोष्टी जपल्या जात होत्या. अनुदान मिळायचे किंवा नाही मिळायचे, कोणी लोकसहभागातून, तर कोणी आपल्या संस्थेच्या मंडळाने चालवित होते . कधी अन्नाचा तुटवटा पडायचा, कधी कधी उपासमारीची सुध्दा वेळ यायची पण वसतीगृहात शिकणाऱ्या विद्यार्थाचे शिक्षण मात्र योग्य प्रकारे चालु असायचे.

एकदा बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशी जात असतांना त्यांनी रमाबाईला आपल्या धारवडच्या वराळे मित्राकडे रहायला पोहचविले. वराळे काका वसतीगृह चालवायचे. रमाबाई वसतीगृहात गेल्या असता त्यांना कळाले की, तेथील मुले दोन तीन दिवसापासून उपाशीच आहेत; कारण देणगीदारांकडून धान्याचा पुरवठा न झाल्यामुळे हे घडले. रमाबाईना खूप दुःख झाले, त्या घरी आल्या त्याच्या डोळ्यात अश्रु दाटले होते. वराळे काका तेथे आल्यावर रमाईंनी आपले सोन्याचे दागिने त्या मुलांसाठी काढून वराळे काकांकडे दिले. म्हणजेच येथे सांगण्याचा अर्थ असा की वसतीगृहातील शिक्षण हे फक्त परोपकाराचे आणि मुलांच्या हितासाठी चालविण्यासाठी येत होते. व्यवहार तेथे गौण होता. शिक्षणात व्यवहार आला की गुणवत्ता आणि सुसंस्कार या दोन्ही बाबी दुर व्हायला लागतात जसे आज घडत आहे.

माझेही शिक्षण वसतीगृहातच झालंय. वसतीगृहात मिळालेली शिकवण आणि संस्कार कायम स्वरूपी आमच्या मनात रुजल्या गेल्या. आमच्या वसतीगृहातील अधिक्षक सुभाष पवार आजही आमच्या स्मरणात आहे. रात्री अगदी एक वाजता येवून प्रत्येक विद्यार्थी व्यवस्थित आहे की नाही पाहायचे आणि पहाटे चार ला दररोज व्यायाम आणि अभ्यासासाठी उठवायचे. आजही इतनी शक्ती.. ही प्रार्थना म्हणताना आम्हाला सर आठवतात. एखादया मुलांनी अभ्यास पूर्ण केला नाही तर वर्गशिक्षक पवार सरांना सांगायचे की तुमच्या मुलांनी आज गृहपाठ नाही केला? , म्हणजे वसतीगृहात शिकणारी मुले जणू त्या अधिक्षकांची होती. सर मुलांवर जीवापाड प्रेम करायचे. मुलांचा अभ्यासच नव्हे; तर आजूबाजुच्या वीसपंचवीस गावात वसतीगृहातील मुलांची मैदानी खेळात महती होती . म्हणजेच आमच्या पॅन्टला ठिगळ असेल पण प्रामाणिकता आणि संस्काराला कुठेच स्वार्थाची किंवा व्यसनाची ठिगळ नव्हती. आज साध्या कपडयाचे रुपांतर जिन्समध्ये झाले पण असंख्य व्यसनाची, अप्रामाणिकतेची ठिगळ पालकांना दिसते. समाजाला दिसते तेव्हा आपण डोळेझाक करून घेतो.

शाळेत मिळणाऱ्या पेटीत गुटखा, तंबाखू, पत्ते पाहायला मिळते आणि ते खाऊन इथे तिथे थुंकलेले आपणास पाहायला मिळते. तरीही वसतीगृह का हवीशी वाटतात त्याचे कारण आजही सर्वसाधारणपणे गरीब वर्गाकडे मुलांच्या शिक्षणाकरीता दूसरा पर्याय दुसरी सोय नसते आणि पालकांना वाटते माझी मुले शिकली पाहिजे. अशा परिस्थितीत आपणास असे अनेक उदाहरणे दिसतील की जी मुले तेथे दाखल आहेत आणि आपल्या गावात सैरावैरा फिरत आहेत. म्हणजे हजेरीवर मुले आहेत आणि प्रत्यक्षात ते गावातच डेरा मांडून बसलेले असतात. आपणास पुष्कळदा वर्तमान पत्रात वाचायला मिळते की एखादा विद्यार्थी घरी दगावला जातो आणि पोलिस जेव्हा शाळेत चौकशीसाठी जातात तेव्हा तो विद्यार्थी हजेरीवर त्याही दिवशी हजर राहतो ? असे का ?. शेकडो उदाहरणे आपणास पाहायला मिळतात की मुलांचे शोषण झाल्याचे , अत्याचार झाल्याचे दिसतात का तर ; शिक्षणात व्यवहाराने आणि अनैतिकतेने मार्गक्रमण केलेले आहे. जेथे असे घडत आहे तेथे विद्यार्थाचे काय कशाचाच विचार केला जात नाही. आपल्याला कोणावरही दोष दयायचा नाही मग येथे चुकतो कोण ? प्रशासन ? संस्था? वा पालक ? तर उत्तर मिळेल सर्वच काही प्रमाणात जबाबदार आहेत. पालकांकडे आपला पाल्य काय करतो यासाठी वेळ नसतो, संस्थाना वाटते ही जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे आणि कर्मचाऱ्यांना वाटते, जावु दे ? आणि प्रशासनाच्या समोर या गोष्टी येत नसाव्यात किंवा जाणिवपूर्वक येवू दिल्या जात नाहीत पण आता हे सारे थांबणे गरजेचे आहे. पैसापेक्षा शिक्षण आणि मुलांचे भविष्य खूप महत्वाचे आहे. कारण आजचा विद्यार्थी म्हणजे उदयाचा सुज्ञ नागरीक ! जर आज विद्यार्थी संस्कारक्षम, गुणवत्तापूर्ण झाला नाही तर उदयाचा दिवस यांच्यासाठी खूप वेगळा असेल. ते जीवनभर स्वतासोबत जेथे शिकत होती तेथील लोकांना कोसत बसतील.

आजही अनेक आश्रमशाळा किंवा वसतीगृहात आहेत जेथे मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण, चांगले आरोग्य आणि उत्कृष्ठ आहार दिला जातो आणि आजही तेथून हजारो मुले आदर्शाचे धडे घेवून बाहेर पडत आहेत. म्हणून सुजलाम सुफलाम महाराष्ट्राला बळकट बनविण्यासाठी भौतिक सुविधेसोबत गुणवत्ता पुर्ण शिक्षण पुरविणे आपले आद्य कर्तव्य आहे . मुलांना व्यसनापासून परावृत करणे देखील तितकेच गरजेचे आहे.

– विनोद राठोड ( लेखक सांकव महाराष्ट्राचे सदस्य आहेत )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *