ब्लॉग – शेवटचा दिवस गोड व्हावा..!

कोरोना या जागतिक महामारीमुळे शासन निर्णय झाला आणि वारकऱ्यांनी समाजहित जोपासत यंदाची पाय वारी न करण्याचा निर्णय घेतला. पायी वारी नाही म्हटल्यावर अनेक वारकऱ्यांची अवस्था – “जीवना वेगळी मासोळी” अशीच झाली होती. सुज्ञपणे मनाला आवर घालून आपण सर्व मानसवारी या संकल्पनेत रमण्याचा प्रयास करत राहिलो.. पण भोळा भाव अंतरंगी दाटला, मनातली भेटीची अनावर ओढ आण्णांना स्वस्थ बसू देईना. अनेकांनी विनंत्या केल्या, समजुत घातली, पोलिसांची भीती दाखवली, संसर्गाचे भय सांगितले.. पण सारे व्यर्थ. आषाढी एकादशी जशी जशी जवळ आली तसे तसे त्यांचे पाय पंढरी कडे ओढू लागले.. आणि घरी कोणालाही न सांगता मुंबईहून थेट देहूला आले. तुकोबारायांच्या कळसाच दर्शन घेतलं आणि थेट निघाले.. मुख्य रस्त्याला पोलीस अडवतील, म्हणून आड रानाने, अक्षरशः वेड पांघरून (वेडा म्हणून कोणी अडवणार नाही यासाठी) वेड्यासारखे दररोज ४० -४० किलोमीटर चालत – चालत कसले धावत – धावत एकादशीला पंढरपूरला पोहचले. पंढरीच्या वाळवंटात लोळण घातली, चंद्रभागेचं स्नान झालं, कळसाचं दर्शन घडलं, मंदिर बंद असलं तरी त्यांचा विठोबा त्यांना बाह्य उभारून सांगत होता ,”आण्णा पोहचले तुम्ही”..भरून पावलं होत.

जोपर्यंत पंढरीत पोहचत नाही तो पर्यंत देह भावाची कसलीच पर्वा किंबहुना जाणीव नव्हती.. देह जावो अथवा राहो ! पांडुरंगे दृढ भावो. ते फक्त धावत होते.. काय खाल्ल असेल, कुठे झोपले असतील पांडुरंगालाच ठावे. पण दर्शन घडल्यावर स्वताच्या सुजलेल्या पायाकडे लक्ष गेलं, अगोदरच मेंदूची झालेली सर्जरी आणि त्यात हे दररोजच धावणं त्यामुळे आता त्रास जाणवायला लागला होता.. कसेबसे मुंबईला परत आले.. आण्णाचे जिवलग आप्पा आणि भाऊ यांच्याशी,” मी घरी पोहचलोय, मला जरा त्रास हुतूया, मी दवाखान्यात जातूय पण मी लयं समाधानी हाये.. आता जीव गेला तरी फिकीर न्हाय”… एवढंच शेवटचं बोलणं झालं.. आणि त्रयोदशीला सकाळी फोन आला आण्णा गेले.. पांडुरंगाच्या चरणी दिव्य ज्योत समर्पित झाली..आणि तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळी ओठावरून ओघळल्या ” याजसाठी केला होता अट्टाहास! शेवटचा दिस गोड व्हावा!! “…

आज आण्णाचा दशक्रिया विधी..
शिरपूरचे आण्णा एवढीच त्यांची ओळख अख्या सोहळ्याला पुरेशी.. त्यांचे नाव नागनाथ सुरवसे.. पांढरी दाढी, डोक्याला गांधी टोपी, मळकट पांढरी कपडे, लेंगा- पायजमा, कपाळाला भलामोठा बुक्का, उंचपुरा सहा फूट उंचीची रांगडी देह यष्टी, दिसायला कणखर पण आतून मात्र अत्यंत हळवे, बोलताना सोलापुरी भाषेतला तिखट गोडवा, प्रत्येकावर भरभरून प्रेम करणारं व्यक्तिमत्व.. गुरुवर्य महंत महादेव शास्त्री बोराडे आणि पावनधाम दिंडीचे निष्ठावान वारकरी.. महाराजांचे पूज्य पिताश्री विष्णुदास भाऊ आणि माझे पूज्य पिताश्री रामदास आप्पा, आणि शिरपूरचे अण्णा ही त्रीपुटी सातत्याने एकत्र.. तिघेही आषाढी – कार्तिकी पायीवारी बरोबरच महिना वारीचे नियमाचे वारकरी..

” आपणासारखे करिती तात्काळ ! नाही काळवेळ तयालागि!!”. या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे अण्णांना भाऊंचा सहवास लाभला आणि जीवन पालटून गेले. कारखान्याची उसाची तोड आणि भाऊंच्या ऊसाला अण्णांची ट्रक लागली एवढच संपर्क येण्याचं निमित्त.. दररोज दारू- गांजा, मांस खाणे- पिणे, अंगभर जखमा ,वार, यांच्या खुणा , गुंडागर्दी, भांडणं, यातच पूर्वायुष्य गेलं .पण भाऊंच्या सहवासात आयुष्याचं सोन झालं. ” अर्ध क्षण घडता संताची संगती! तरी होय तुटी महत्पापा !!” या न्यायाने केवळ ४ दिवसांचा सहवास लाभला आणि श्रध्दा जडली.. भाऊंनी एकदा माझ्या घरी जेवायला यावं म्हणून हट्ट धरला. जेवायला येतो पण वारकरी व्हावं लागेल, माळकरी असल्याशिवाय आम्ही त्या घरातलं पाणी पण घेत नाही. कबुल असेल तर माळ घाल. मनाला शब्द लागले.आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण केली , वारकरी व्रताचा निष्ठापूर्वक स्वीकार केला आणि जीवनाला परीस स्पर्श झाला.

आज जवळ – जवळ १८ वर्ष झाली एकदाही आषाढी – कार्तिकी पायी वारी खंड नाही तो शेवटपर्यंत.. त्या बरोबरच या तिघांची महिना वारी ठरलेलीच. आपल्या ट्रक गाड्या दिंडी साठी विनामूल्य ड्रायव्हर सह पुरवत, अन्नदान, मंदिर समाज कार्याला कित्येक देणग्या , देऊन समाजकार्यात स्वताला निर्मळ मनाने समर्पित केले. दोन वर्षांपूर्वी पंढरीच्या जवळ पेशवेकालीन पांडुरंगाच्या मंदिराचा यांनी शोध लावला होता. जीर्ण झालेल्या या पुरातन मंदिराचा तिघांनी मिळुन जीर्णोध्दार केला. दर महिन्याला एकादशीला पंढरीला यायचं, रात्री या मंदिरात जागर करायाचा आणि द्वादशीला ला पारण फेडून आप्पा पुण्याला, भाऊ बीड ला,आणि अण्णा मुंबईला निघून जायचे.

आता मात्र आण्णा दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. आता नाही येणे जाणे ! सहज खुंटले मरणे !! म्हणत ते विठ्ठलमय झाले.. त्याची वारी फलद्रूप झाली…अशा निष्ठावंत वारकऱ्याला मात्र आम्ही पारखे झालो…आता पुन्हा आषाढी येईल, प्रस्थान होईल पण ,पालखीला खांदा लावून ऊर फुटेपर्यंत नाचणारे अण्णा नसतील, टाळ मृदंग घोष होईल पण स्वतःच्या खांद्यावर पखवाज वाजवणाऱ्याला घेऊन मैलोन – मैल चालणारे अण्णा असणार नाहीत.. महप्रसादाच्या पंगती बसतील पण प्रेमाने खाऊ घालणाऱ्या अन्नाचा आग्रह होणार नाही..तंबू पडतील पण मायेचं पांघरून घालणारे अण्णा असणार नाहीत..मुक्कामाच्या तळ सजेल पण रात्रभर पहारा द्यायला अण्णा आमच्यात नसतील.

वैकुठवासी आण्णाच्या पवित्र आत्म्याला भावपूर्ण श्रध्दांजली.

– गणेश महाराज भगत , पुणे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *