राजकारणापलीकडचे भावा बहिणीचे नाते पुन्हा अधोरेखित..!

| मुंबई | जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाने गाठले असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत भगिनी पंकजा मुंडे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने धनंजय यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. ‘बंधू तब्येतीची काळजी घे, लवकर बरा होऊन घरी ये’ असे यावेळी पंकजा यांनी धनंजय यांना सांगितले.  या निमित्ताने राजकारणापलीकडेही नाती महत्त्वाची असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. .

बीडच्या राजकारणात पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे या बहिण-भावातील संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या संघषार्ने अगदी टोक गाठले होते. प्रचारात अत्यंत खालची पातळी गाठली गेली होती. परळीच्या लढाईत धनंजय यांनी बाजी मारत पंकजा यांना पराभूत केले होते. या साऱ्या संघषार्तून आलेली कटुता धनंजय यांच्या आजारपणाने दूर सारली गेली आहे. धनंजय यांच्या काळजीपोटी पंकजा यांनी लगेचच त्यांच्याशी संपर्क साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *