लॉकडाऊन परिस्थितीत रुग्णांना मिळणार मोफत केस पेपर – महापौर नरेश म्हस्के


ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभागसमितीनिहाय खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी रुग्णांकडून 10 रुपये इतकी केसपेपर फी आकारण्यात येत होती. रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत व गर्दी टाळावी यासाठी लॉकडाऊन असेपर्यत रुग्णांकडून केसपेपरसाठी 10 रुपये फी आकारली जावू नये असे ‍निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रान्वये महापालिका आयुक्तांना दिले, यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊन परिस्थीतीत नागरिकांना साध्या आजारांवर देखील उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या विविध भागात आरोग्यकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. महापालिका आरोग्यकेंद्रातील सर्व डॉक्टर्स हे कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे खाजगी डॉक्टरांच्या मदतीने या आरोग्यकेंद्रात रुग्णांना सेवा दिली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून ते देखील रुग्णांमध्ये सोशल डिस्टान्सींग पाळले जावे यासाठी आरोग्यकेंद्रात मदत करीत आहेत. या आरोगयकेंद्रात येणाऱ्यां रुग्णांकडून 10 रुपये केसपेपरची फी आकारण्यात येत असल्यामुळे काही व्यक्ती हेतुपुरस्सर याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सद्यस्थीतील रुग्णांकडून केसपेपरची फी आकारण्यात येवू नये अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना पत्रान्वये आयुक्तांना केली होती. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी देखील तात्काळ ही मागणी मान्य करुन आरोगयकेंद्रांना सूचना देवून लॉकडाऊन असेपर्यत केसपेपरची फी न आकारण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महापौरांनी आयुक्त विजय सिंघल यांच्यासह कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी काम करीत असलेल्या महापालिकेच्या सर्व अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस यांच्या कामाची दखल घेवून त्यांचे कौतुक केले आहे.

सद्यस्थितीत सर्वजण कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वेच्छेने मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळावी, व सोशल डिस्टान्सींग पाळले जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे रुग्णांना निश्चीतच दिलासा मिळेल असे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. तसेच या कामी पुढाकार घेवून सहकार्य करणाऱ्या खाजगी डॉक्टर्स व सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्ते करीत असलेल्या कामाचे महापौरांनी कौतुक केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *