अध्याय ३ : तख्तास जागा हाच गड करावा – रायरीला शिवपदस्पर्श

अश्मयुगीन कालखंड ते आदिलशाहीच्या वतीने जावळीकर मोरे यांच्या निगराणीखाली रायरीचा दुर्ग कसा आला याची माहिती आपण घेतली. काही कालावधीमध्येच जावळीच्या मोऱ्यांचा प्रमुख चंद्रराव यशवंत मोरे आणि शिवाजी महाराज यांच्यात बेबनाव निर्माण झाला आणि त्याचा शेवट रायरी सह सर्वच जावळीचा प्रदेश स्वराज्यात सामील होऊन झाला. शिवाजी महाराज आणि जावळीकर मोरे यांच्यात जो तंटा झाला आणि त्यात अंती शिवरायांचा जो जय झाला ते संपूर्ण प्रकरण म्हणजे त्याकाळी चालत असलेल्या राजकारणाची संपूर्ण जाणीव करून देणारी घटना आहे. एक प्रशासक आणि युद्धनीतीकार म्हणून शिवरायांचे व्यक्तिमत्व या प्रकरणात उलगडते. त्या एकूण बखेड्याचा उहापोह आपण आज करणार आहोत.

जावळीकर मोरे यांच्याशी शिवरायांचा संपर्क १६४८ मध्ये आला. जावळीचे मोरे हे आदिलशाही जहागीरदार होते व आदिलशहाने त्यांना “ चंद्रराव ’’ हा किताब दिला होता. संपूर्ण जावळीचा प्रदेश मोऱ्यांच्या ताब्यात होता. १६४८ मध्ये मोरे घराण्याचे प्रमुख म्हणून जावळीचा कारभार पाहणारे चंद्रराव दौलतराव मोरे हे निपुत्रिक मरण पावले. त्यावेळी त्यांची विधवा पत्नी माणकाई व इतर मोरे मंडळींनी शिवरायांशी सल्लामसलत करून यशवंतराव नावाचा मुलगा दत्तक घेतला. हणमंतराव मोरे ह्यांच्या मदतीने जावळीच्या विस्तृत जहागिरीचा कारभार त्या पाहू लागल्या. त्यासमयी मोरे घराण्यात हणमंतराव मोरे , दौलतराव मोरे, प्रतापराव मोरे अशी अनेक मातब्बर मंडळी जावळीवर वर्चस्व राखून होती व या सर्वांचा प्रमुख म्हणून यशवंतराव मोरे काम करत होता. बरीच वर्षे मोरे व शिवाजी महाराज यांचे संबंध चांगले राहिले.

या दरम्यान अफजलखान याची नेमणूक वाईचा सुभेदार म्हणून झाली. अफजल खानाची इच्छा संपूर्ण जावळी थेट आदिलशाही अधिपत्याखाली आणण्याची होती . त्यादृष्टीने त्याने हालचाली सुरु केल्या होत्या. जावळीचा प्रदेश अत्यंत दुर्गम असल्याने बऱ्याच समस्या उत्पन्न होत होत्या. जावळीकर मोरे हे शिवरायांशी सख्य ठेवून होतेच त्यामुळे अफजल खानाचा मनसुबा ध्यानी येताच त्यांनी शिवरायांकडे मदत मागितली व शिवरायांनी देखील मदतीचा शब्द दिला. आधीच जावळीचा दुर्गम प्रदेश त्यात मोरे मंडळी मातब्बर आणि शिवरायांनी सहकार्याचा दिलेला शब्द यामुळे खानाचे मनसुबे पूर्णत्वास जाऊ शकले नाहीत. प्रसंग कठीण निर्माण झाला तेंव्हा मोरे यांनी शिवरायांशी सख्य ठेवले हि गोष्ट इथे लक्षात ठेवावी लागेल. १६५४ मध्ये अफजल खानाची वाईवरून कनकगिरी येथे बदली झाली आणि मोरेंच्या जीवावरचे दुखणे उठले. मोरे मंडळी आता जबरदस्तीने वागू लागली. त्याच्या ह्या अन्याय व जुलूम जबरदस्तीच्या बातम्या शिवरायांच्या कानी येऊ लागल्या. शिवरायांनी वारंवार पत्रव्यवहार करून रयतेला त्रास न देण्याच्या सूचना मोरेंना केल्या. रयत सुखी करता यावी म्हणून स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांस जावळीच्या रयतेवर मोरे मंडळी करत असलेल्या जुलुमाची चीड येणे स्वाभाविक होते. मोरे हे त्यांच्या भागाचे राजे असल्यागत वागत होते आणि त्याला तसे कारणही होते. जावळीचा सगळा प्रदेश दुर्गम. नवीन फौजेला तेथे लढाई करणे सहज शक्य नव्हते. जावळीच्या प्रदेशातून जाणार्या घाटवाटा आणि त्यातून मिळणारा जकातीचा वाटा यामुळे चंद्रराव मोरे आर्थिकदृष्ट्या देखील भक्कम होते. हि सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शिवरायांनी दीर्घकालीन धोरण आखून मोऱ्यांचा बिमोड केला. एकदम जाऊन मोरेंवर हल्ला करणे हे आत्मघाताचे ठरले असते.. सत्तेत आणि आर्थिक संपदेत धुंद झालेले मोरे सर्वांवरच जुलूम करू लागले तेंव्हा मात्र एका माल पाटलाने न्यायी, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष शिवरायांकडे दाद मागितली आणि जावळीच्या राजकारणात शिवरायांचा थेट प्रवेश झाला.

रायरीचा दुर्गापासून अदमासे १६ मैल अंतरावर बिरवाडी म्हणून गाव लागते. तिथला माल पाटील हा मोरेच्या जुलुमाला कंटाळला होता. आदिलशाहीचा पाटील असल्याने पाटीलकी म्हणून बिरवाडी चा वसूल रायरीचा हवालदारास देणे त्याचे सनदी नोकर म्हणून काम होते. ते काम हा पाटील इमाने इतबारे करत होता परंतु या पाटीलकी चा मोबदला म्हणून जो उत्पन्नाचा प्रदेश त्या पाटलास दिला होता त्याचे उत्पन्न मात्र मोरे हडप करीत होते. काही बोलायला जावे तर मोरे मंडळी बलवान. अशाच एका प्रकरणात रामोजी वाडकर नामक व्यक्तीने विरोध केला म्हणून चिखली येथे त्याचा खून मोरे मंडळींनी केला होता. हे सर्व अत्याचार बिरवाडी चा पाटील सहन करत असतानाच मोरे मंडळींनी आणखी एक पराक्रम केला. पाटलाच्या उत्पन्नाचा प्रदेश त्यांनी परस्पर कांगोरी किल्ल्याच्या तैनातीस लावून दिला. त्यामुळे बिरवाडी च्या पाटलावर होणाऱ्या अन्यायास कळस चढला. अखेरीस त्याने जाऊन शिवरायांकडे न्याय मागितला. त्याची बाजू न्यायाची असल्याने शिवरायांनी त्याला कौल दिला व त्याचे वतन त्याला परत दिले. आपल्या मुलुखात शिवाजी राजांनी केलेला हस्तक्षेप अर्थातच जावळीकर मोरेना पचनी पडला नाही. मोरेंच्या प्रकरणात सरळ हस्तक्षेप करता यावा असे काही प्रकरण देखील उद्भवले नव्हते. मात्र लवकरच तशी संधी शिवरायांना चालून आली.

शिवाजी महाराज हे स्त्रियांना अत्यंत आदराने वागवीत असत. स्त्रीवर अत्याचार करणारा कुणीही असला तरी त्याला शासन करायला शिवरायांनी कमी केले नाही. रांझ्याच्या पाटलाचा शिवरायांनी चौरंगा केला हे त्याचेच द्योतक. स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा एक गाव कुळकर्णी “ रंगो त्रीमल वाकडे ‘’ याने एका विधवा स्त्री सोबत बदअंमल केला. हि गोष्ट उघडकीस येताच आपल्याला शिवाजीराजे कठोर शासन करणार याची जाणीव त्या दुराचारी नराधमास झाली व तो घाबरून जावळीला आश्रयास पळाला. चंद्ररावाने त्याला आश्रय दिला आणि शिवराय प्रचंड चिडले. स्त्री वर अत्याचार करणाऱ्याला केवळ राजकारण म्हणून अभय आणि आश्रय देणे शिवरायांना अजिबात पटले नाही. स्वराज्यात गुन्हा करून जर असे अपराधी जावळी ला जाऊन लपू लागले तरव मग स्वराज्याला अर्थ तो काय उरणार? त्यामुळे आता शिवरायांनी जावळी जिंकण्याचे ठरवून त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. बिरवाडीचा पाटील आधीच शिवरायांच्या बाजूने होता. पोलादपूर परिसरात मातब्बर असणाऱ्या गोळे घराण्यातील व्यक्तीस कौल देऊन शिवरायांनी त्याला मोरेंपासून वेगळा केला त्यामुळे महाबळेश्वर मधून खाली कोकणात उतरण्याचा महाराजांचा मार्ग निर्धोक झाला. चंद्रराव मोरे याच्या जाचाला कंटाळलेल्या लोकांना शिवरायांसारखा न्यायी व कर्तबगार पुरुष हा देवदूतच भासला असावा. अशा अनेक वतनदारांना कौल देऊन शिवरायांनी आपल्या बाजूस वळवून घेतले व मोरेंना एकाकी पाडले त्यामुळे ऐन लढाईच्या प्रसंगी एकही वतनदार मोरेंच्या सहाय्यास आला नाही.

या सर्व घटना १६५१ ते १६५३ दरम्यान घडत होत्या तरी जावळी वर थेट आक्रमण करण्याचे शिवरायांनी टाळले याला लष्करी दृष्टीकोनातून बरीच कारणे होती. अफजल खानाचा मनसुबा जावळी काबीज करण्याचा असला तरी आदिलशाही सरदार म्हणून जावळी मध्ये काही प्रसंग पडल्यास सहाय्य करणे त्याला क्रमप्राप्त होते. सिंहगड प्रकरण नुकतेच घडून गेले होते व शाहजी राजे नुकतेच कैदेतून सुटले होते. त्यामुळेच सह्याद्रीचा हा वाघ दबा धरून बसला होता वेळप्रसंगी संयम हेच सर्वात मोठे शस्त्र असते हे शिवरायांनी वेळोवेळी दाखवून दिले. हा कालखंड देखील असाच. सर्व सिद्धता झाली होती , जावळी मधले बहुतांश वतनदार शिवरायांच्या बाजूने झाले होते. जावळी च्या खोऱ्याचा संपूर्ण अभ्यास करून झाला होता त्यामुळे तो प्रदेश एकदमच नवीन आहे असा राहिला नव्हता. सर्व तयारी करून शिवराय योग्य संधीची वाट पाहत होते आणि अखेर ती संधी शिवरायांना मिळाली. १६५४ मध्ये अफजलखान वाईवरून बदलून कनकगिरीला गेला. विजापूरचा आदिलशाह जो आधीच आजारी होता त्याचे दुखणे वाढले आणि तो मरणासन्न झाला. त्यामुळे साहजिकच गादीसाठी विजापुरात अंतर्गत कलह सुरु झाले. याच संधीचा फायदा उठवायचा असे शिवरायांनी ठरवले. मुख्य राजधानीत सुरु झालेले राजकारण, अफजलखान निघून गेलेला आणि नवीन सुभेदार अजून आला नव्हता. या अवस्थेत मोरेंच्या मदतीला लवकर कुणी येण्याची सुतराम शक्यता नव्हती. हे सर्व असे अनुकूल झाल्यानंतर शिवरायांनी जावळीची मोहीम हाती घेतली आणि चढाईला सुरुवात केली.

शिवरायांच्या बाजूने असलेले कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर , बांदल व संभाजी कावजी आदी लोकांनी मोऱ्यांचे जांभळी म्हणून ठिकाण होते ते काबीज केले त्यानंतर जोर खोऱ्यात लढाई झाली तिच्यात हणमंतराव मोरे मारला गेला व जोर खोरे ताब्यात आले. लढाईच्या दुसऱ्या अंगाने स्वत: शिवाजीराजे दहा हजारांची फौज घेऊन जावळी म्हणून जे मोऱ्यांचे मुख्य ठिकाण होते त्यावर चालून आले. दहा हजारांच्या फौजेच्या दोन तुकड्या करण्यात आल्या. मोठी तुकडी रडतोंडीच्या घाटातून सोडली तर छोटी तुकडी घेऊन शिवाजी महाराज महाबळेश्वर मार्गे निसणीच्या घाटाने जावळीत उतरले. सैन्याला प्रतिकार फारसा झालाच नाही. “शांततेच्या काळात जितका घाम गाळाल युद्धात तितकेच कमी रक्त सांडावे लागते’’ हा नियमच इथे शिवरायांनी दाखवून दिला. मोरेंचे मुख्य ठिकाण काबीज झाले असले तरी ह्या खाणीतल्या अस्सल रत्नावर शिवरायांची नजर पडणे अजून बाकीच होते. मोरेंचा प्रमुख चंद्रराव मोरे हा पळून रायरीचा किल्ल्यावर गेला आणि तिथून उपद्रव करू लागला. त्यामुळे शिवरायांनी स्वत: जावळीस मुक्काम करून हैबतराव शिळीमकर यांना ३० मार्च १६५६ रोजी रायरी वर पाठवले आणि मागाहून स्वत: शिवाजीराजे ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीचा पायथ्याला आले व वेढा सुरु केला. साधारण महिनाभर चंद्रराव मोरेने वेढा लढविला परंतु मे महिन्याच्या मध्यास त्याने गुंजण मावळचे देशमुख शिळीमकर यांच्या मध्यस्तीने तह केला गडाखाली येऊन शिवरायांची भेट घेतली व किल्ला शिवरायांच्या स्वाधीन केला. रायरीचे भाग्य उजळले..आणि तो दिवसही तसाच सुमंगल होता वैशाख शुद्ध द्वितीया शके १५७८ म्हणजेच अक्षय्य तृतीया या मुहूर्तावर रायरीचा किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला आणि बहुतेक त्याच दिवशी शिवराय गड चढून माथ्यावर आले रायरीच्या दुर्गपुरुषाला सह्याद्रीपुत्राचे दर्शन झाले आणि मनोमन दोघांनी एकमेकांना नमन केले असेल. त्या दोघांच्या मनीचे हितगुज काही कुणी नोंदवून ठेवले नाही. त्यावेळी शिवरायांच्या मुखातून निघालेले उद्गार जरी बखरीत लिहिले गेले असले तरी त्याहून खूप काही जास्त अस शिवरायांच्या मनात दाटून आले असणार हे नक्की.

रायरीचा डोंगर म्हणाला असेल…. “ या शिवबा राजे या….आज माझ्या आयुष्यातील अंधारी रात्र सरली. तुमचे पाय माझ्या माथ्यावर पडले आणि माझ भाग्य उजळल. मी हा असाच उभा आहे हजारो वर्ष झाली. असंख्य ऋतु पहिले झेलले पण आज जितका आनंद होतोय तितका कधीच नव्हता झाला राजे. मी इथ उभा असलो तरी तुमची दिगंत कीर्ती माझ्या कानावर पडतच असते. इथे येणारी लोक करतच असतात चर्चा तुमच्या पराक्रमाची, स्वकर्तृत्वाने तुम्ही सुरु केलेल्या महानतम कार्याची. राजे…राजे तुम्ही काळाच्या वीणेवर असा काही प्रहार केलाय कि त्याचा नाद युगानुयुगे निनादत राहील. तुमच्या या कार्यात माझ्या अंगाखांद्यावरील प्रत्येक दगड तोफेचा गोळा बनून सहकार्य करेल. या घडीपासून हा रायरीचा डोंगर सदैव तुमच्या पाठीशी असेल. राजे….घडवा रयतेच स्वराज्य घडवा.’’

शिवराय मनोमन म्हणाले असतील , “ हे दुर्गश्रेष्ठा वंदन, बराच काळ झाला तुला पायथ्याशी उभा राहून निरखत होतो. तुमच पहिलं दर्शन झाल तेंव्हाच काहीतरी अमुल्य ठेवा पाहतो आहे याची जाणीव झाली. सह्याद्रीत राज्य करायचे असेल तर कारभार तुमच्यासारख्या बेलाग दुर्गाच्या खांद्यावरूनच हाकावा लागेल. खूप काळ झाला काहीतरी शोधत होतो पण नेमक काय शोधतोय ते तुमच दर्शन झाल्यावर कळल. आपल दोघांच भाग्य कदाचित फार आधीच एकत्र जोडलं गेल आहे. तुमच्या या लेकराला कुशीत घ्या.’ असा हा काल्पनिक संवाद घडला असेल का.?

 त्याच उत्तर शिवरायांनीच नंतरच्या कारकिर्दीत दाखवून दिलेलं आहे भौतिक परिमाण वापरून उत्तुंग ठरवता येणारा दुर्ग आणि आपल्या कर्माने आणि कर्तृत्वाने उत्तुंग ठरलेले शिवराय यांची हि पहिली भेट झाली ती अशी आणि त्यावेळी शिवराय बोलले… “ तख्तास जागा हाच गड करावा ” .

|| श्री राजा शिवछत्रपती असे शक्तिदाता || 

– दुर्गसेवेसी तत्पर , मावळा निरंतर
प्रविण काशिनाथराव काळे-देशमुख , रायगड

5 Comments

  1. अप्रतिम शब्दरचना अभ्यासपुर्ण विवेचन

  2. प्रविण सर खुप सुंदर माहिती तुम्ही सांगितली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *