मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आमदार होणारच..!


मुंबई : विधानसभेतील आमदारांनी विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागा येत्या २४ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. त्या जागांसाठी दोन आठवडयांच्या पूर्वसुचनेनुसार निवडणुका घेणे शक्य असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ मे पर्यंत आमदार होण्यात अडचण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठाकरे यांनी विधानसभेचे सदस्यत्व स्वीकारायचे ठरवले तर एखाद्या आमदाराला राजीनामा देत जागा रिक्त करावी लागेल. मग त्या रिक्त जागेवर ठाकरेंनी लढायचे ठरले तर आयोगाला निवडणूक घोषित करावी लागेल. त्यासाठी ४५ दिवसांचा अवधी आवश्यक असतो. मात्र परिषद निवडणुकीचे तसे नाही. रिक्त होणाऱ्या जागांसाठी आयोगाला १५ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे, हे सांगणारे नियम आहेत.

त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातला लॉक डाउन १४ एप्रिलनंतर आरोग्यमंत्र्यांच्या आजच्या विधानानुसार अगदी ३० एप्रिलपर्यंत वाढला तरी त्यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीत निवडणूक होवू शकेल.रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी २ शिवसेना सदस्य आहेत. आमदारांनी निवडून देण्याची निवडणूक आकडेवारीच्या निकषावर शिवसेनेला फारशी कठीण नसल्याने आमदार होणे ठाकरेंसाठी कठीण नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिनविरोध निवडणूक झाली तर तीन आठवड्यांचा कालावधी दोन आठवड्यांवर येतो. तशाच दिशेने पावले पडावीत असा प्रयत्न सुरू आहे. अन्यथा ‍ मे च्या पहिल्या दोन दिवसांत अधिसूचना निघाली तरी २६ मे पर्यंत हाती तीन आठवडे आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *