दिलासादायक – मॉल्स वगळता इतर दुकानं सुरु करण्यासाठी सवलत..!
केंद्र सरकारचा निर्णय..!| नवी दिल्ली | देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे.

महत्वाचं म्हणजे या सवलती हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू नाहीत. आतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला अशीच दुकानं सुरू होती. आता त्यात बदल करुन इतर दुकानं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र हे करताना सोशल डिस्टन्सिंग तसंच मास्क घालणे बंधनकारक आणि दुकानांमध्ये 50 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी, असा नियम घातला आहे. मोठी दुकानं तसेच विविध ब्रँडची मॉलसारखी दुकानांना ही सवलत नाही. केंद्राच्या  आदेशानंतर राज्य सरकार आता त्यांची ऑर्डर काढणार आहे. त्यानुसार राज्यात कोणती दुकान सुरू होतील आणि कुठे ते स्पष्ट होईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी हॉटस्पॉट तसेच कोरोना बाधितांच्या संख्येनुसार झोन तयार करण्यात आले आहेत. देशभरात साथरोग अधिनियम कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक रोखण्यासासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी व तत्सम अधिकार्‍यांना विशेषाधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

कोरोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून सगळीकडे अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला वगळता मॉल्स, व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि अन्य प्रकारची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सवलत देण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *