कोरोना वरील असा आहे प्लाझ्मा उपचार..?


  • रक्तातील प्लाझ्मा हा घटक यासाठी वापरला जातो.
  • या पद्धतीत कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा हा घटक वापरला जातो.

मुंबई / प्रतिनिधी : जगभरामध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून आतापर्यंत लाखो जणांना या विषाणूची लागण झाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्वप्रथम चीन येथील वुहान प्रांतात सापडलेला हा नोव्हेल कोरोना व्हायरस आता जगभरामध्ये पसरला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन यांसारख्या प्रगत देशांमधील आरोग्य व्यवस्थेला कोरोनाने जेरीस आणलंय. या जीवघेण्या आजारावर अद्याप कोणताही औषधउपचार अथवा प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने कोरोनाचा अटकाव करण्यामध्ये अडचणी येत आहेत. जगभरामध्ये या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात येतोय.

अशातच आज दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा उपचार पध्दतीबाबतची माहिती दिली. गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार या उपचार पद्धतीमध्ये कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा हा घटक वापरला जातो.

याबाबत एका वृत्त संस्थेशी बोलताना गुलेरिया यांनी, ‘कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये या आजाराशी लढण्यासाठी अँटी-बॉडीज (रोगप्रतिकारक प्रथिने) तयार होत असतात. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरात या अँटी-बॉडीज कायम राहतात. यामुळेच प्लाझ्मा उपचार पद्धतीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील अँटी-बॉडीज कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरामध्ये रक्तसंक्रमित केल्या जातात.’ अशी माहिती दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *