ई लर्निंग पायाभूत मानून आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे शाळा सुरू करता आल्या नाहीत तरी शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. त्यादृष्टीने तज्ज्ञांशी चर्चा करून ‘ई लर्निंग’च्या माध्यमातून शिक्षण पद्धतीचा सर्वंकष आराखडा तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

 मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शाळा सुरू होणार नाहीत. पण शिक्षण सुरूच राहील, असे नियोजन करणे आवश्यक आहे. ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यायांचा विचार करावाच लागेल. विशेषत: कंटेन्मेंट झोनमधील शाळा बंद राहतील. ग्रीन झोन मध्ये सुरु करता येतील. पण झोनची परिस्थिती बदलली तर अडचणी निर्माण होतील. महापालिका क्षेत्रांमध्ये ग्रीन झोन कमी आहेत. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरूम्स पर्याय वापरता येईल. ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहेत. पण त्याठिकाणी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

मुख्य सचिव मेहता यांनी कोरोनाच्या नियमांचा पालन करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु होईल, असे गृहीत धरून नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी, राज्यात ७५० शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरु असल्याची माहिती वंदना कृष्णा यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करण्याच्या तसेच प्रथम वर्ष प्रवेशाच्या नियोजनाची माहिती दिली. सीईटीच्या परीक्षांसाठीही तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *